वाळूत रूतलेली होडी तब्बल बारा दिवसानंतर समुद्रात
जेसीबी अन् क्रेनचा वापर : मालकाला 64 लाख रुपयांचा फटका
कारवार : येथील रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर (दिवेकर वाणिज्य महाविद्यालयाच्या पाठीमागे) गेल्या 12 दिवसांपासून वाळूत रूतून बसलेली ती पर्शीयन मच्छीमारी होडी (यांत्रिक होंडी) शेवटी अरबी समुद्रात ओढून नेण्यात यश आले आहे. यासाठी होडीच्या मालकाला 35 लाख रुपये खर्च करावे लागले. शिवाय होडीचे इंजिन, गियर बॉक्ससह अन्य यंत्रणा नादुरुस्त झाल्याने होडीच्या दुरुस्तीकरीता होडी मालकाला आणखी 29 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, दोन आठवड्यांपूर्वी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, अरबी समुद्रात प्रक्षुब्ध वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी उतरलेल्या यांत्रिक होड्याना समुद्र किनारा गाठण्याचा इशारा देण्यात आला होता. परिणामी कारवार जिल्ह्यातील होड्यांसह उडुपी, मंगळूर जिल्ह्यातील आणि गोवा तामिळनाडू आदी राज्यांतील शेकडो होड्या रविंद्रनाथ टागोर किनाऱ्यालगत अरबी समुद्रात नांगरण्यात आल्या होत्या. त्यावेळी समुद्र भलताच खवळल्याने मंगळूर जिल्ह्यातील दोन होड्यांचे नांगर तुटले आणि त्या होडी भरकटल्या. पुढे त्या दोन होड्या येथील दिवेकर वाणिज्य महाविद्यालयाच्या पाठीमागे रूतून बसल्या. यापैकी एक होडी अल्पशा प्रयत्नानंतर समुद्रात ओढून नेण्यात आली.
होडीवर 12 मच्छीमारीबांधव कार्यरत
तथापि, सुखकल-मंगळूर येथील फारुक यांच्या मालकीची बिस्मा नावाची पर्शीयन बोट रूतलेल्या स्थळावरुन हलविण्यात यश आले नाही. या होडीवर 12 मच्छीमारी बांधव कार्यरत होते. ही रूतलेली होडी समुद्रात ओढून नेण्यासाठी अन्य होड्यांकडून प्रयत्न करण्यात आले. होडी ओढण्यासाठी वापरलेले दोरखंड तुटले, पण रूतलेली होडी काय जाग्यावरुन हलली नाही. बंदर खात्याच्या मालकीची टग् होडी वापरुन ती बोट हलविण्याची सूचना मच्छीमारी आणि बंदर विकास मंत्री मंकाळू वैद्य यांनी केली. तथापि, बंदर खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्याच्या सूचना मनावर घेतल्या नाहीत.
सेल्फीसाठी होडीभोवती गर्दी...
पर्याय म्हणून यल्लापूर येथून मागविण्यात आलेल्या जेसीबी आणि क्रेनचा वापर होडी हलविण्यासाठी करण्यात आला. तरीसुद्धा पहिले दोन-तीन दिवस अपेक्षित यश मिळू शकले नाहीत. आणि शेवटी जेसीबी व क्रेनच्या मदतीला स्थानिक होड्या, तटरक्षक दलाचे जहाज आणि स्वत: अरबी समुद्र (भरतीच्या रुपाने) धाऊन आल्याने या मोहिमेची यशस्वी सांगता झाली. या प्रकरणाची नोंद कारवार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, अनेकांनी सेल्फीची हौस भागविण्यासाठी होडीच्या आसपास मोठी गर्दी केली होती, असे सांगण्यात आले.