मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना झटका
व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी फेटाळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तिहार तुरुंगात कैद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक झटका बसला आहे. इन्सुलिनच्या मागणीवरून दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे डॉक्टरांशी सल्लामसलत करू देण्याची केजरीवालांची याचिका फेटाळली आहे. मागील काही दिवसांपासून केजरीवालांना इन्सुलिन दिले जात नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जात आहे.
केजरीवालांनी याचिकेद्वारे तिहार तुरुंगात इन्सुलिन देण्याचा निर्देश देण्याची आणि शर्करापातळी आणि मधुमेहावरून दररोज 15 मिनिटे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची अनुमती देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
तत्पूर्वी केजरीवालांनी तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. मला इन्सुलिन मिळत नसून याप्रकरणी तिहार प्रशासन खोटं बोलत आहे. मी दररोज इन्सुलिनची मागणी करत आहे. ग्लुकोमीटरचे रीडिंग दाखवून दिवसातून 3 वेळा शर्करापातळी अधिक राहत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. तिहारचे प्रशासन राजकीय दबावापोटी खोटं बोलत असल्याचा दावा केजरीवालांनी पत्रात केला होता.
दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत अबकारी घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करत असलेल्या ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मधूमेहतज्ञ डॉक्टराशी सल्लामसलत करून पुन्हा इन्सुलिन घेऊ इच्छितो असे केजरीवालांनी याचिकेद्वारे म्हटले होते. तर केजरीवालांच्या या याचिकेला ईडी आणि तिहार तुरुंग प्रशासनाने न्यायालयात विरोध दर्शविला होता.