मनपा आयुक्तांचा ‘नगररचना’ला दणका
सांगली :
सात लाखाच्या लाचेप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर आयुक्त सत्यम गांधी अॅक्शन मोडवर आले आहेत. बुधवारी कुपवाड विभागाकडील स्थापत्य अभियंता आजम जमादार यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली. आयुक्तांच्या दणक्यामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, लाचखोर उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील निलंबनाची टांगती तलवार कायम आहे.
24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाखाची लाच मागितल्याप्रकरणी मनपाचे उपायुक्त वैभव साबळे यांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटकेची कारवाई झाल्यामुळे मनपा प्रशासक म्हणून आयुक्त सत्यम गांधी अॅक्शन मोडवर आले आहेत
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय कुपवाड कार्यालयाला आयुक्त सत्यम गांधी यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी या कार्यालयामध्ये नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले होते. संबधित नागरिकांकडे विचारणा केली असता नागरिकांनी नगररचना विभागाकडील दिरंगाईबाबत तक्रारी केल्या. नागरिकांनी यावेळी नगररचना विभागाकडील बऱ्याच दिवसापासून काम होत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने नगररचना विभागाकडील दैनंदिन कामकाजाचा निपटारा वेळेत होत नसल्याचे निदर्शनास आले व कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये नगररचना कार्यालय तसेच क्षेत्रिय कार्यालय क्रमांक तीनमध्ये स्थापत्य अभियंता आजम जमादार हजर नसल्याचे तसेच नोंदवहीमध्येदेखील नोंद केली नसल्याचे आढळून आले. नगररचना विभागाकडील प्रस्तावास मान्यता देण्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याबाबत आयुक्त यांना समक्षात विचारणा केल्याचे निदर्शनास आले आहे.
आजम जमादार यांनी नगररचना विभागात कार्यालयीन वेळेत हजर राहून कामकाज करण्याची जबाबदारी असताना त्यांनी कसूर केली. मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडताना हालचाल वहीत नोंद करणे आवश्यक असताना त्यांनी कोणतीही नोंद न करता कार्यालय सोडले. आयुक्त सत्यम गांधी यांनी ही बाब गांर्भियाने घेत आजम जमादार यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त करण्याची मोठी कारवाई केली. जमादार याना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागितला होता. पण जमादार यांनी केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली.
- थेट आयुक्तांनाच पैसे विचारण्याचे धाडस
बडतर्फ पेलेल्या आजम जमादार याने आयुक्त सत्यम गांधी यांनाच लाच आणि पैसे घेणार का अशी विचारणा करण्याचे धाडस केले होते. याप्रकरणाची आयुक्तांनी गांर्भियाने दखल घेत जमादार याच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली.