कुंभमेळ्यात पक्षी उत्सवही होणार
वृत्तसंस्था / प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जानेवारीमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच कुंभमेळ्यात पक्षी उत्सवाचाही समावेश केला जाणार आहे. 1 आणि 2 फेब्रुवारीला हा पक्षी उत्सव साजरा करण्यात येणार असून त्याचा उद्देश जनतेला निसर्गाशी जोडणे हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 13 जानेवारीपासून महाकुंभपर्वाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महाकुंभ पर्वाच्या निमित्ताने लक्षावधी भाविक येथे येणार आहेत. लोकांची ही प्रचंड संख्या लक्षात घेऊन पक्षी उत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत निसर्ग संरक्षणाचा संदेश पोहचविण्याची संधी पक्षी महोत्सवाच्या आयोजकांना या महाकुंभपर्वामुळे मिळणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
हा पक्षी उत्सव उत्तर प्रदेश सरकारच्या वनविभागाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी अरविंद कुमार यांनी दिली. या उत्सवातून पर्यावरण आणि वायुमंडल संरक्षणासंबंधी जनजागृती व्हावी, असा प्रयत्न केला जाणार आहे. जागतिक तापमान वाढीचे संकट साऱ्या जगावर सध्या ओढवले असून पर्यावरण, वने आणि वृक्ष यांचे संवर्धन आणि संरक्षण केल्यासच या संकटावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठी नागरीकांचे प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कुमार यांनी यावेळी केले.