‘किलर क्वीन’ संबोधिला जाणारा पक्षी
माणसांइतकी असते उंची, सापांना मारण्याची पद्धत चकित करणारी
सेक्रेटरी बर्ड जगातील सर्वात लांब रॅप्टर पक्षी असून तो विषारी सापांना फस्त करण्यास तरबेज आहे. याचमुळे त्याला ‘किलर क्वीन’ म्हटले जाते. या पक्ष्याची उंची माणसांइतकी असते, याचे पाय लांब आणि अत्यंत शक्तिशाली असतात. हा एक शिकारी पक्षी असून काही क्षणांमध्ये सापांना ठार करत असतो. याची साप मारण्याची पद्धत चकित करणारी आहे.
सेक्रेटरी बर्ड हा आफ्रिकेत आढळून येतो आणि गवताळ मैदानांमध्ये त्याचा अधिवास असतो. अधिक संख्येत साप असलेल्या ठिकाणी हा पक्षी प्रामुख्याने दिसून येत असतो. परंतु हा पक्षी स्वत:चा बहुतांश वेळ जमिनीवर शिकार करण्यास घालवत असतो, पण हा पक्षी उड्डाणातही अत्यंत पारंगत असतात. हा पक्षी झाडांवर स्वत:चे घरटे तयार करतात, जेथे ते रात्रभर आराम करत असतात. या पक्ष्यांचे सरासरी आर्युमान 10-15 वर्षांदरम्यान असते.
सेक्रेटरी बर्डची उ&ची 4.1 ते 4.9 फूटांदरम्यान असते, हे प्रमाण जवळपास मानवी उंचीइतके आहे. याच्या पंखांचा फैलाव 6.9 फूट असतो. याचे वजन 5-9.4 पाउंडपर्यंत असते. या पक्ष्यांचे पाय अन्य कुठल्याही शिकारी पक्ष्याच्या तुलनेत सर्वात लांब असतो. हा पक्षी सापाच्या शिरावर इतक्या जोराने लाथ मारतो की साप काही क्षणात मृत्युमुखी पडतो. हा पक्षी सर्पदंश होण्यापूर्वी जवळपास 100 पट वेगाने किक मारू शकतो. सेक्रेटरी पक्षी सर्वसाधारणपणे सापांची शिकार करतात, परंतु ते पाली, टोळ आणि उंदिरही फस्त करत असतात.