बर्फ परी म्हणवून घेणारा पक्षी
कापसाच्या चेंडूप्रमाणे दिसणारा
शिमा एनागा हा अत्यंत गोंडस पक्षी आहे. हा पक्षी जपानच्या होक्काइडोमध्ये आढळून येतो. हा एक छोटा पांढऱ्या रंगाचा पक्षी आहे. तो कापसाच्या एका चेंडूप्रमाणे दिसून येतो. लांब शेपूट असलेला बुशटिटची ही एक पोटप्रजाती असून त्याला सिल्वर थ्रोटेड टाइट किंवा सिल्वर थ्रोटेड डॅशर म्हणूनही ओळखले जाते. तसेच या पक्ष्याला बर्फ परी या नावानेही ओळखण्यात येते. आता या पक्ष्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहून तुम्ही त्याच्या क्यूटनेसवर फिदा होऊन जाल.
शिमा एनागा हा जपानी पक्षी कापसाच्या चेंडूप्रमाणे दिसतो. हा पक्षी गोल आणि मनमोहन असतो. याचमुळे लोक याला मोठ्या प्रमाणात पसंत करत असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे. शिमा एनागा हा जपानमधील सर्वात छोटा पक्षी आहे. तो स्वत:च्या लांब शेपटासह जवळापस 14 सेंटीमीटर लांबीचा असू शकतो. याला जपानचा सर्वात प्रेमळ पक्षी आणि बर्फ परी असेही नाव मिळाले आहे. याची तुलना अनेकदा पंख असलेल्या ‘पोकेमोन’शी देखील केली जाते.
जपानमध्ये हा पक्षी अत्यंत लोकप्रिय आहे. याचमुळे जपानमधील खेळणी, किचैन आणि स्टेशनरीवर शिमा एनागा पक्ष्याचे डिझाइन आणि छायाचित्रे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. शिमा एनागा पक्षी जंगलांमध्ये, पर्वतांवर आणि उद्यानांमध्ये दिसून येतो. पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या पक्ष्यामध्ये आहे. याचमुळे तो हिमाच्छादित उंच भागांमध्येही दिसून येतो. कापसाप्रमाणे असलेले फर या पक्ष्यांना थंडीपासून रक्षण प्रदान करते. या पक्ष्याचे पंख मजबूत असल्याने तो वेगाने उडू शकतो. झाडांवरील रस ग्रहण करण्यासोबत किटकांना तो भक्ष्य करत असतो. परंतु या पक्ष्यांना गरुडासारख्या मोठ्या पक्ष्यांकडून धोका असतो. हे मोठे पक्षी याची शिकार करतात.