For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशच्या अल्पसंख्याकांसाठी मोठे पाऊल

06:48 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशच्या अल्पसंख्याकांसाठी मोठे पाऊल
Advertisement

सीमेवरील स्थितीवर नजर ठेवण्यासाठी समिती स्थापन : भारतीय, हिंदू, अन्य अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बांगलादेशातील सद्यस्थिती पाहता भारत सरकार सतर्क आहे. आता केंद्र सरकारने तेथील अराजकता पाहून मोठे पाऊल उचलले आहे. बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवर नजर ठेवण्यासाठी सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. बीएसएफच्या पूर्व कमांडच्या अतिरिक्त महासंचालकांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.  ही समिती बांगलादेशात राहणारे भारतीय, हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करणार आहे.

Advertisement

बांगलादेशातील स्थिती पाहता मोदी सरकारने बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवर नजर ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती बांगलादेशातील अधिकाऱ्यांसोबत संवाद राखून तेथे राहणारे भारतीय नागरिक, हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे. या समितीचे अध्यक्षत्व बीएसएफच्या पूर्व कमांडचे अतिरिक्त महासंचालक यांच्याकडे असेल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत दिली आहे.

समितीच्या अन्य सदस्यांमध्ये बीएसएफ फ्रंटियर मुख्यालय, दक्षिण बंगालचे महानिरीक्षक, बीएसएफ फ्रंटियर मुख्यालय त्रिपुराचे महानिरीक्षक, एलपीएआयचे सचिव सामील आहेत. बांगलादेश हिंसेमुळे घाबरलेले तेथील अल्पसंख्याक विशेषकरून हिंदू मोठ्या संख्येत पश्चिम बंगालला लागून असलेल्या सीमेच्या दिशेने धाव घेत आहेत. बांगलादेशातील स्थिती बिघडल्याने सीमेवर तेथील अल्पसंख्याकांची मोठी गर्दी होत आहे. बांगलादेशी हिंदू भारतात आश्रय मिळवू पाहत आहेत. सिलिगुडी, किशनगंज आणि मुकेश पोस्टवर बांगलादेशातील हिंदू जमा होत आहेत. बीएसएफकडून बॉर्डर गार्ड बांगलादेशशी सातत्याने संपर्क साधला जात असून या लोकांना त्यांच्या देशातच रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बीएसएफ आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशचे कमांडर स्तराचे अधिकारी परस्परांशी संवाद साधून व्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहेत. तर वैध कायदेशीर दस्तऐवज असलेल्या बांगलादेशी लोकांना इंटीग्रेटेड चेकपोस्टद्वारे भारतीय सीमेत दाखल होण्याची अनुमती आहे. तसेच येथून नियमित व्यापारही सुरू झाला आहे.

इकडे काटेरी कुंपण, तिकडे बांगलादेशी हिंदू आतूर

बांगलादेशात उलथापालथ सुरू असून जमात-ए-इस्लामी तसेच बीएनपीकडून तेथील हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. अशास्थितीत बांगलादेशी हिंदू आता भारताच्या सीमेवरील कूचबिहार जिल्ह्याच्या काटेरी कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला जमले आहेत. स्थिती पाहता या भागात बीएसएफच्या 157 बटालियनच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. जलपाईगुडीत देखील सीमेवर हजारो बांगलादेशी हिंदू पोहोचले आहेत. हे सर्वजण सीमा ओलांडून भारतात येऊ पाहत आहेत. बीएसएफने त्यांना सतकुरा सीमेवर रोखले आहे. बांगलादेशात आमची घरे-मंदिरे जाळली जात आहेत, याचमुळे आम्ही भारतात आश्रय घेऊ पाहत आहोत असे बांगलादेशी हिंदूंचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.