Karad News : उंब्रजला सेवारस्त्यावर भला मोठा खड्डा ; अपघाताचा वाढला धोका
उंब्रज येथील खड्डा दिवसेंदिवस वाढतोय
उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथील सेवारस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून वाहतूक कोंडी आणि अपघाताचे सत्र सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या देखभाल विभागाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक वाहतुकीसह राज्यमार्ग आणि महामार्गावरील सर्व वाहतुकीवर ताण निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई तसेच अनेक लोकप्रतिनिधींची नियमित ये-जा असूनही प्रश्न सुटलेला नाही.
नीतिराज पेट्रोल पंपांपासून पुढे उंब्रजमध्ये प्रवेश करताना चिकन-मटण दुकाने असलेल्या भागात सेवारस्त्यावर अर्धा ते एक फूट खोल खड्डा पडला आहे. त्यात सांडपाणी साचत आहे. खड्ड्याची रुंदीही दिवसेंदिवस वाढत जाऊन अर्धा रस्ता पूर्णपणे व्यापू लागला आहे. दिवसभर येथे अनेक वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहनधारकांना हा खड्डा चुकवताना कसरत करावी लागत आहे. अनेक बाहनांचे संतुलन बिघडून किरकोळ अपघात घडले आहेत. खड्डा चुकवण्यासाठी वाहनांना वळण घ्यावे लागते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते.
दरम्यान, उंब्रज येथील उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यास अजून काही महिने लागणार असल्याने सेवारस्त्यांची दुरुस्ती आणि रुंदीकरण गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवसांत बाहतूक कोंडी अधिकच तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाहनधारकांची होत असलेली त्रेधातिरपीट थांबवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने या 'महाखड्या'कडे त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.