इटलीकडून चीनला मोठा झटका
चीनच्या ‘बीआरआय’मधून बाहेर पडण्याची घोषणा
वृत्तसंस्था/ रोम
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा ड्रीम प्रोजेक्ट बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) आता अडचणीत आला आहे. युरोपीय देश इटलीने अधिकृत स्वरुपात आता या प्रकल्पातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील एका कार्यकारी समितीने यासंबंधी चीनच्या सरकारला कळविले आहे. इटलीचा हा निर्णय चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासाठी अडचणीचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. बीआरआयमध्ये सामील होणारा इटली हा पहिला युरोपीय देश होता. पंतप्रधान होण्यापूर्वी मेलोनी यांनी बीआरआयमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असल्याचे आश्वासन देशवासीयांना दिले होते.
बीआरआय कराराला इटली आणि चीनमधील मैत्रीचे प्रतीक मानले गेले होते. पंतप्रधान मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील एका टीमकडून करार रद्द करण्यात आल्याचे पत्राद्वारे चीनच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. इटली आणि चीन यांच्यात अनेक आठवड्यांपर्यंत पडद्याआड चर्चा झाली असली तरीही यातून कुठलाच निष्कर्ष निघू शकला नव्हता.
अब्जावधी डॉलर्सच्या या प्रकल्पात सामील करविण्यासाठी चीनने माजी पंतप्रधान ग्यूसेप कोंटे यांची दिशाभूल केली होती असे इटलीच्या राजकीय जाणकारांचे सांगो आहे. इटली बीआरआयमध्ये सामील झाल्याने अमेरिका नाराज झाला होता. यामुळे इटलीने औपचारिक स्वरुपात आता बीआरआयमधून अंग काढून घेतले आहे. इटलीच्या सरकारने संबंधित करार रद्द करत चिनी प्रकल्पातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला आहे.
सर्व प्रयत्न अयशस्वी
इटलीने कराराच्या अटी बदलून ही स्थिती टाळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चीनने नव्या अटी मानण्यास नकार दिला होता. बीआरआय प्रकल्पात सामील असलेला इटली हा जी-7 मधील एकमेव देश होता. इटलीच्या या निर्णयावर चीनकडून कशाप्रकारची प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.