For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लुईझिन फालेरो यांच्या चिंतनातील ‘अ बेटर गोवा’

03:07 PM Oct 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
लुईझिन फालेरो यांच्या चिंतनातील ‘अ बेटर गोवा’
Advertisement

पुस्तकाद्वारे गोव्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक वाटचालीतील घटनांवर प्रकाशझोत : पुस्तक लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर

Advertisement

डॉ. मधुसुदन जोशी/पणजी

गोव्याच्या राजकारणात गेली चार दशके सक्रिय असलेल्या माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचं ‘अ बेटर गोवा’ हे पुस्तक लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहे. गोव्याच्या सार्वजनिक जीवनात योगदान देताना त्यांना आलेले गोड, कडू अनुभव व्यक्त करुन गोव्याच्या भवितव्याविषयीचे चिंतन फालेरो यांनी मांडले आहे. गोवा चांगला कसा झाला असता, किंवा चांगला कसा होऊ शकतो याबद्दल आपली मते त्यांनी मांडली आहेत. हे पुस्तक गोव्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक वाटचालीतील घटनांवर प्रकाझोत टाकत आहे.

Advertisement

संवेदनशील मनातील भावना 

वयाची पंचाहत्तरी गाठलेले फालेरो हे कायद्याचे पदवीधर आहेत. त्यांनी काही काळ कामगार चळवळीचे नेतृत्व केले. ऐंशीच्या दशकात ते नावेली मतदारसंघातून प्रथम निवडून आले. नंतर सहावेळा त्या मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात त्यांनी प्रथम आमदार म्हणून नंतर मंत्री व मुख्यमंत्री म्हणून गोव्याची धुरा सांभाळली. आपल्या कारकिर्दीत आपण काय केले, काय मनात होते व काय व्हायला पाहिजे याची गोळाबेरीज त्यांनी पुस्तकात मांडली आहे. त्यांचा या वाटचालीत गोव्यात जी आंदोलने झाली त्यात त्यांची भूमिका काय होती, याचा उहापोह त्यांनी पुस्तकात केला आहे. पुस्तकात त्यांनी हरित गोवा, ज्ञानी गोवा, भविष्यातील गोवा व शाश्वत गोवा अशी मांडणी केली आहे. गोव्यातील राजकीय बदल खासकरून जनमत कौल व घटक राज्य ह्या बाबतचे फालेरो यांचे विचार जगजाहीर आहेत. आता राजकीय निवृत्ती स्वीकारली असल्याने अवतीभोवती होणारे बदल होताना त्यांच्या संवेदनशील मनाला जाणवले त्यातून त्यांना पुस्तक लिहायची स्फूर्ती व वेळ मिळाला असावा.

गोव्याचा विकास व वृक्षहानी 

गोव्याचा विकास व त्या कारणास्तव होणारी वृक्षहानी याचा समन्वय त्यांना दिसत नाही. असं का होतं असा प्रश्न विचारत ते थेट आपल्या आमदारकीच्या सुरूवातीच्या काळात जातात. फालेरो आपल्या पुस्तकाची सुरूवात ‘गोव्याची पुनर्मांडणी’ प्रकरणाने करतात. स्वामीनाथन यांचा सुविचार उद्धृत करून शेती, खाजन जमीन आदींचा विचार ते मांडतात. पण ह्यातील किती गोष्टी साध्य होतील याबाबत शंका आहे, याची त्यांनाही जाणीव असावी म्हणून ते शेवटी म्हणतात की, याबाबत निव्वळ बौद्धिक घेण्याऐवजी प्रत्यक्ष शेतात उतरून चिखलात हात बुडवावे लागतील.

वृक्ष संवर्धन कायदा 1984

वृक्ष संवर्धनासाठी त्यांनी मांडलेल्या खाजगी विधेयकात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खाजगीत पाठिंबा दर्शवला, पण ते विधेयक मांडण्यापासून त्यांनी फालेरो यांना प्रवृत्त केले. कारण राज्य चालवायचे म्हणजे आमदार सांभाळायचे. ज्या आमदारांचे हितसंबंध, सॉ मिल व जंगलतोडीत गुंतलेले आहेत त्यांना दुखावून कसं चालेल, हा प्रश्न बहुधा सगळ्याच मुख्यमंत्र्यांसमोर आलेला असणार आणि फालेरो यांनी त्याचा अनुभव देखील घेतलेला असेल. तरी देखील गोवा, दमण व दीव वृक्षसंवर्धन कायदा 1984 हे त्यांच्या कार्याचं फलित होतं. आपल्या या यशाचा सार्थ अभिमान ते ‘शेवटचा वृक्ष तोडण्या अगोदर’ प्रकरणात व्यक्त करतात. पश्चिम घाट संवर्धन, हवामान बदल, म्हादई आदीबाबत फालेरो पोटतिडकीने मते मांडतात.

ज्ञानाला नाही पर्याय 

ज्ञानाला पर्याय नाही हे ओळखून त्यांनी ज्ञान संवृद्धीसाठी एक वेगळं प्रकरण लिहिलं आहे. फालेरो हे अल्पकाळ गोव्याचे शिक्षणमंत्री होते. त्याच काळात शैक्षणिक धोरण, एनसीईआरटी अभ्यासक्रम, नॉलेज कमिशन आदी गोष्टी चालीस  लावल्या. राष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठ स्थापन व्हावे यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याचा आढावा पुस्तकात त्यांनी घेतला आहे. रोजगार निर्मितीवरील त्यांचे भाष्य फार बोलके आहे.

काही विषयांना दिलीय बगल 

भावी गोवा कसा असावा याबाबत त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत. त्यांनी  गोव्याबद्दल आपले विचार मांडले हे कौतुकास्पद आहे. परंतु गोव्याचे औद्योगिकरण, मायनिंग, तसेच पर्यटन  विशेषत: कॅसिनो, ड्रग्स  आदीबाबत  खास काही त्यांच्या पुस्तकात नाही. गोव्यात येणारे परप्रांतीय लोक, भूबळकाव, गोव्यातून बाहेर जाणारे सुशिक्षित तऊण, कलाक्षेत्र आदी विषयांना त्यांनी बगल दिलेली आहे. फालेरो हे मूळचे कामगार नेते. नंतर ते मजूरमंत्री बनले. त्याकाळात कौशल्य विकास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. भूमिपुत्रांविषयी कायम कळवळा. त्यातूनच त्यांनी 1991 मध्ये मजूर व रोजगार धोरण आखलं. खरं तर बेरोजगारीबाबत ठोस काही करायचं असल्यास कुठल्याही सरकारने फालेरो यांच्या ह्या संकल्पनांचा विचार करावा अशाच आहेत.

आयटीबरोबर बायो टेक्नॉलॉजी हे उद्याचं क्षितिज आहे, ह्याची जाणीव फालेरो यांना होती हे पुस्तकात जाणवतं. आज अमेरिका विविध प्रकारे जे  व्यापारी दडपण भारतवर आणत  त्यात कृषी क्षेत्र हे प्रामुख्याने आहे. ह्या क्षेत्राच्या विकासासाठी फालेरो यांचे विचारमंथन नक्कीच उपयुक्त आहे. अन्नाबरोबर निवारा या समस्येची उकल फालेरो यांनी आपल्या पुस्तकात केली आहे. गोव्याच्या जमिनीची होणारी विक्री ह्या बाबत ते चिंतीत न झाल्यास नवल होते. याबाबत नक्की कायद्याने ते थांबवणे अशक्य आहे याची जाणीव त्यांना आहे म्हणून गोव्याचा अति विकास होणं थांबवणं गरजेचं आहे असा त्यांचा सूर आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना जंगल तोडीबाबत त्यावेळचे मुख्यमंत्री  राणे यांनी काय सांगितलं याचा उल्लेख पुस्तकात सुऊवातीला आला आहे.

Advertisement
Tags :

.