मनपा सभागृहातील ठरावाला केराची टोपली
महसूल उपायुक्त तालीकोटी पुन्हा मूळ ठिकाणी रुजू : सत्ताधारी गटात असंतोष
बेळगाव : महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांची अन्यत्र बदली करावी, असे पत्र मंगळवारी सत्ताधारी गटातर्फे मनपा आयुक्त शुभा बी. यांना दिले होते. मात्र यावर मनपा आयुक्तांनी कार्यवाही केली नसल्याने महसूल उपायुक्त तालीकोटी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणीच रुजू झाल्या आहेत. त्यामुळे तालीकोटी यांची अन्यत्र बदली करावी, या मागणीसाठी सत्ताधारी गटातर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
महसूल खात्यात गैरप्रकार घडण्यासह अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. महसूल विभागाच्या उपायुक्त तालीकोटी यांच्यावरही गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात आहेत. वेगा हेल्मेट प्रकरणासह पीआयडी, ए व बी खाता त्याचबरोबर अन्य काही प्रकरणात त्यांच्यावर आरोप असल्याने त्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी, लोकायुक्त चौकशीप्रकरणातही तालीकोटी यांचा सहभाग आहे. त्यामुळेच चौकशी समितीची स्थापना करून जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत त्यांची अन्यत्र बदली करावी, असा ठराव बैठकीत करण्यात आला आहे.
ठराव पारित केल्यानंतर मनपा आयुक्त शुभा बी. यांनी प्रभारी महसूल उपायुक्त म्हणून कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांची नियुक्ती केली होती. पण आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता उपायुक्त तालीकोटी पुन्हा आपल्या मूळ जागी रुजू झाल्या असून त्यांनी आपले कामकाज सुरू केले आहे. सर्वसाधारण बैठकीत पारित केलेल्या ठरावानुसार तालीकोटी यांची अन्यत्र बदली करण्यात यावी, असे पत्र मंगळवारी सत्ताधारी गटाच्यावतीने महापौर मंगेश पवार यांनी मनपा आयुक्तांना दिले होते पण त्यावर आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.
या प्रकाराबाबत सत्ताधारी गटात असंतोष पसरला आहे. पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी शनिवारी चर्चा केली जाणार असून बदली न केल्यास मनपासमोर आंदोलन करण्याची तयारी सत्ताधारी गटाने चालविली असल्याची माहिती मिळाली आहे. महसूल उपायुक्त तालीकोटी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास 15 दिवसांची मुदत घेण्यात आली आहे. एकंदरीत सुरू असलेली परिस्थिती पाहता तालीकोटी यांना क्लिन चिट मिळाल्यास त्या पुन्हा त्याठिकाणी सेवेत कायम राहण्याची शक्यता आहे.