भोपळ्याने तयार नौकेतून 70 किमीची सैर
अमेरिकेतील व्यक्तीकडून विश्वविक्रम
अमेरिकेतील एका इसमाने अशाप्रकारच्या भोपळ्याचे पीक घेतले आहे, ज्याचा वापर त्याने नौकेच्या स्वरुपात केला आहे. गॅरी क्रिस्टेंशन नावाच्या इसमाने वॉशिंग्टनच्या कोलंबिया नदीच्या काठावरून 73.5 किलोमीटरचा प्रवास केला आहे. भोपळ्याने निर्मित नौकेतून करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात लांब प्रवास ठरला आहे.
46 वर्षीय गॅरीने स्वत:च भोपळ्याचे पीक घेतले आणि त्याला नौकेच्या स्वरुपात तयार केले आहे. त्याने 26 तासांपर्यंत भोपळ्याला नैकेच्या स्वरुपात नदीत चालविले. गॅरी यांनी या नौकेला ‘पंकी लोफस्टर’ हे नाव दिले होते.
पंकी लोफस्टरचा आकार 14 फूटांचा होता, तर याचे वजन 555 किलोग्रॅमपेक्षा अधिक होते. 11 ऑक्टोबरपासूनच त्यांनी या भोपळ्याला नौकेचा आकार देण्यास सुरुवात केली होती. त्यांनी या नौकेत एक कॅमेराही बसविला होता. त्यांनी स्वत:च्या नौकेवर ‘हा खरा भोपळा आहे’ असे लिहिले होते. गॅरी क्रिस्टेंशन 2011 पासून भोपळ्याचे पीक घेत आहेत. भोपळ्याच्या नौकेतून प्रवासासाठी गॅरी क्रिस्टेंशन याचे नाव आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे.
अमेरिकेच्या नेब्रास्का येथील रहिवासी डुआने हॅनसेन यांनीही भोपळ्याद्वारे निर्मित नौकेतून प्रवास केला आहे. त्यांना देखील गॅरी क्रिस्टेंशन यांच्याप्रमाणे छंद म्हणून मोठे भोपळ, दुधी भोपळा आणि अन्य भाज्यांचे पिक घेणे पसंत आहे.