किल्ल्यात मिळाले 58 वर्षे जुने बाटलीबंद पत्र
पत्रात जेम्स बाँडला होता संदेश
अनेकदा जगापासून दूर एखाद्या समुद्र किनारयावर दशकांपेक्षा जुनी एखादी वस्तू मिळत असते. अशाचप्रकारे इंग्लंडच्या जर्सीमध्ये क्वीन एलिझाबेथ यांच्या महालात आगीच्या भट्टीत मिळालेली वस्तू चकित करणारी होती. 1966 मधील एक बाटलीबंद पत्र येथे मिळाले आहे. या पत्रातील संदेश हा प्रसिद्ध गुप्तहेर व्यक्तिरेखा जेम्स बाँडच्या नावाने होता.
एलिझाबेथ कॅसलमध्ये अधिकाऱ्यांच्या क्वार्टरच्या पहिल्या मजल्यावर दुरुस्तीचे काम करत असलेल्या मजुरांनी भट्टीची चिमणी खुली केल्यावर त्यात एका बाटलीत लपविण्यात संदेश मिळाला आहे. 26 फेब्रुवारी 1966 रोजी हे पत्र लिहिण्यात आले होते. ‘007 जेम्स बाँड, 26 फेब्रुवारी 1966. पी.एस. सीक्रेट एजंट, कुणाला सांगू नकोस’ असे या पत्रात नमूद आहे. तर पत्रामागे ‘ई.ए. ब्लैम्पिड’, (बहुधा जर्सी कलाकार एडमंड ब्लैम्पिड) असे लिहिले गेले आहे. ब्लैम्पिड यांचा ऑगस्ट 1966 मध्ये मृत्यू झाला होता. हे पत्र शॉन कॉनरी यांची भूमिका असलेला जेम्स बाँडपट थंडरबॉल प्रदर्शित झाल्याच्या दोन महिन्यांनी लिहिण्यात आले होते.
बाटलीत साप्ताहिक रेवेइलचे 23 फेब्रुवारी 1966 रोजीच्या आवृत्तीची 15 ते 18 क्रमांकाची पाने देखील होती. आता जर्सी हेरिटेजने या बाटलीतील रहस्यमय पत्रासंबंधी मदतीचे आवाहन लोकांना केले आहे. या पत्राविषयी माहिती असलेल्या व्यक्तीने संपर्क करावा असे जर्सी हेरिटेजकडून म्हटले गेले आहे.
यापूर्वी एका कॅनेडियन महिलेला समुद्र किनाऱ्यावर साफसफाई करताना एक अनोखी गोष्ट मिळाली होती. तिने ही वस्तू सोशल मीडियावर शेअर केली होती. महिलेने एका बाटलीचे छायाचित्र शेअर केले होते, ज्याच्या आत एक संदेश होता. या संदेशासोबत 29 मे 1989 ही तारीख नमूद होती. म्हणजेच ही बाटली एकूण 34 वर्षांपूर्वी पाण्यात टाकण्यात आली होती आणि कित्येक मैलांपर्यंत तरंगत होती. यातील संदेशात ‘हा एक उन्हाचा दिवस असून यात वारा अजिबात नाही’ असे लिहिले गेले होते. हा संदेश केवळ मजेपोटी पाण्यात सोडण्यात आला असावा.