पत्त्यांनी तयार केला 54 मजली बंगला
गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
पत्त्यांच्या खेळाविषयी जवळपास सर्वांनाच माहिती असते. बालपणापासून वृद्ध होईपर्यंत अनेक लोकांचा हा प्रिय खेळ राहिला आहे. बालपणी अनेक जण पत्त्यांचा बंगला उभारण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे घर प्रत्येकवेळी कोसळत असते. परंतु एका इसमाने पत्त्यांचा बंगला निर्माण करत विश्वविक्रम नोंदविला आहे.
अमेरिकेचा रहिवासी असलेल्या एका वास्तुकाराने स्वत:च्या कलेचे प्रदर्शन करत जगातील सर्वात लांब पत्त्यांचे घर निर्माण केले आहे. ब्रायन बर्ग यांनी स्वत:च्या कलाकृतीद्वारे विश्वविक्रम केला आहे. अनेक वर्षांपासून ब्रायन पत्त्यांद्वारे घर निर्माण करत स्वत:च नोंदविलेले विक्रम मोडीत काढत आले आहेत. ब्रायन यांना एक प्राफेशनल कार्ड स्टेकर म्हटले जाते, कारण त्यांनी यापूर्वी देखील पत्त्यांद्वारे अनेक कलाकृती निर्माण केल्या आहेत. यावेळी त्यांनी 8 तासांमध्ये सर्वात लांब पत्त्यांचे घर निर्माण केले आहे, जे 54 मजली होते.
54 मजली पत्त्यांचे घर निर्माण करणे सोपे नव्हते, ब्रायन यांना हे काम पूर्ण करण्यासाठी शिडीचा वापर करावा लागला आहे. परंतु त्यांनी याकरता कुठल्याही प्रकारचा गोंद किंवा तारांचा वापर केलेला नाही. त्यांची ही कलाकृती केवळ पत्त्यांद्वारे तयार करण्यात आली आहे. तसेच त्यांनी घराच्या टोकावर स्वत:चा मोबाइल फोन ठेवला होता.
ब्रायन यांनी पत्त्यांचे घर गिनिज बुक ऑफ रिकॉर्डचे पदाधिकारी थॉमस ब्रॅडफोर्ड यांच्या देखरेखीत तयार केले आहे. ब्रायन यांना विक्रम नोंदविताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. ज्या खोलीत ते कलाकृती निर्माण करत होते, त्यात भरपूर आर्द्रता असणे आवश्यक होते. तसेच खोलीत वारा येऊ नये याची काळजी घ्यावी लागली आहे.