टाटा समूहाच्या कंपनीच्या नफ्यात 5 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी आयटी सेवा प्रदाता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या कामगिरीवर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) ग्राहकांकडून अनावश्यक खर्च कपात आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे परिणाम झाला आहे.
टीसीएसचा आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 11,909 कोटी रुपये होता, जो गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत 11,342 कोटींवरून 5 टक्क्यांनी वाढला आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 1.08 टक्क्यांनी घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 7.6 टक्क्यांनी जास्त 64,259 कोटी रुपये होते.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत गेल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 2.62 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या कमाईने ब्लूमबर्गच्या अंदाजांना मागे टाकले, परंतु निव्वळ नफा अंदाजापेक्षा कमी झाला. ब्लूमबर्गने टीसीएसचे उत्पन्न 64,177 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 12,547 कोटी रुपये असेल असा अंदाज आहे.