For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्यकारिणीच्या पुनर्रचनेसाठी 13 जणांची शोध कमिटी

10:59 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कार्यकारिणीच्या पुनर्रचनेसाठी 13 जणांची शोध कमिटी
Advertisement

तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय : कार्यकर्त्यांची जाणून घेतली मते

Advertisement

बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन 13 जणांची शोध कमिटी नेमण्यात आली आहे. या माध्यमातून तालुक्याच्या गावागावांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गावपातळीवर संघटना अधिक बळकट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.येथील मराठा मंदिर सभागृहामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह सरचिटणीस एम. जी.पाटील व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या उमेदवाराला मिळालेली निच्चांकी मते व यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 20 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी मते मांडली. म. ए. समितीच्या लढ्याला अधिक बळकट करण्यासाठी कार्यकारिणीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. यासाठी जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांबरोबर नवतरुणांनाही कार्यकारिणीमध्ये सामावून घेतले पाहिजे, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश व लोकसभा निवडणुकीत मिळालेली निच्चांकी मते याचा सारासार विचार करणे आवश्यक आहे.हा एक धडा समजून समितीला आणखी अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Advertisement

पुन्हा एकदा म. ए. समिती बळकट करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे

गावपातळीवर ग्रा. पं. च्या माध्यमातून पुन्हा एकदा म. ए. समिती बळकट करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. विभागवार बैठक घेऊन कार्यकारिणी नेमणूक केली पाहिजे. युवा आघाडी, महिला आघाडी यापूर्वी ज्याप्रमाणे सशक्त होती, त्याप्रमाणेच पुन्हा एकदा या संघटनांचे पुनर्रघटन केले पाहिजे. महिला कार्यकर्त्यांसह तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांना संपर्क साधून भविष्यात संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. तसेच अनेक जण राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला बांधले गेल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आल्या. जात-पात न मानता कार्यकारिणीची निवड करण्याचे मतही यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले.

कमिटीतर्फे गावागावांना भेट देणार

यावेळी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बैठकीमध्ये शोध कमिटीसाठी कार्यकर्त्यांकडून सूचित करण्यात आलेली नावे जाहीर करण्यात आली.सदर कमिटीतर्फे गावागावांना भेट देऊन संपर्क साधून कार्यकारिणीची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मराठी संस्कृती, मराठी भाषा टिकविण्याबरोबरच सीमाप्रश्नाला बळकटी देण्यासाठी व कर्नाटक सरकारच्या अन्याय,अत्याचाराला आळा घालण्यासाठी समितीची पुनर्रचना करणे गरजेचे आहे.यासाठी म. ए.समिती आणखी अधिक बळकट केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा निषेध

राज्यात राहायचे असेल तर कन्नडच बोलले पाहिजे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या विधानाचा बैठकीत निषेध करण्यात आला. विद्यार्थी कमी असल्याचे सांगत मराठी शाळा बंद करण्याच्या प्रयत्नाचाही निषेध करण्यात आला.

Advertisement
Tags :

.