हवाई कंपनी इंडिगोला 986 कोटीचा तोटा
जुलै-सप्टेंबर तिमाही निकाल घोषित : महसूलात 13 टक्के वाढ : सोमवारी समभाग 8 टक्के घसरला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील सर्वात आघाडीवरची हवाई कंपनी इंडिगोने आपला दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून या कंपनीला तोटा सहन करावा लागला असल्याची माहिती आहे. इंडिगो अर्थात इंटरग्लोब एव्हिएशनला आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 986 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
एक वर्षाआधी पाहता कंपनीने सदरच्या तिमाहीत 188 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने 16,969 कोटी रुपयांचा एकत्रित महसुल प्राप्त केल्याची माहिती आहे. वर्षापूर्वी याच अवधीत कंपनीने 14,943 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला होता. त्या तुलनेत महसुलात यंदा 13 टक्के वाढ नोंदवण्यात कंपनीला यश आले आहे. तिमाही आधारावर पाहता मात्र महसुलात 13 टक्के इतकी घट झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने 19,751 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला होता. मागच्या तिमाहीत कंपनीने 2729 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
विविध कारणांचा परिणाम
तिसऱ्या तिमाहीत नफ्यात घसरणीची अनेक कारणे सांगितली जात आहेत. यामध्ये शुल्क वाढ, इंधन खर्चात वाढ, अन्य उत्पन्नात घट अशी विविध कारणे सांगितली जात आहेत. विमानतळ शुल्कात 41 टक्के, सप्लीमेंट्री रेंटमध्ये 29 टक्के आणि दुरुस्ती देखभाल व एटीएफ खर्चात 12 टक्के वाढ झाली आहे. इंडिगोला जून तिमाहीत प्रत्येक प्रवाशामागे 5.24 रुपये उत्पन्न मिळत होते ते सप्टेंबर तिमाहीत कमी होत 4.55 रुपये प्रति प्रवासी झाले आहे.
वाढत्या प्रवाशांचा लाभ
देशांतर्गत प्रवाशांची संख्या वाढल्याने महसुलात सप्टेंबरच्या तिमाहीत प्रगती दिसली आहे. दुसऱ्या तिमाहीत 244.49 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केल्याचेही सांगितले जाते. भारतातली कंपनीची हिस्सेदारी पाहता सर्वात जास्त म्हणजे 62 टक्के इतकी दिसून आली. मागच्या वर्षी सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत 234 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला होता.
समभागाची वाटचाल
समभागाचा विचार करता कंपनीचा समभाग 46 टक्के वधारला आहे. जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी समभाग 3.23 टक्के इतके घसरणीसह 4373 रुपयांच्या स्तरावर कार्यरत होते. सोमवारी समभाग 8 क्के घसरत 4015 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा समभाग 5 दिवसात 6 टक्के आणि एक महिन्यात 8 टक्के घसरला आहे. 6 महिन्यात 14 टक्के, 1 वर्षात 80 टक्के आणि यावर्षी 1 जानेवारीपासून पाहता 46 टक्के समभाग वधारला आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 1.69 लाख कोटी रुपये आहे.