For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाज यात्रेत 98 भारतीयांचा मृत्यू

06:34 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
हाज यात्रेत 98 भारतीयांचा मृत्यू
Advertisement

भारताच्या पराराष्ट्र विभागाकडून माहिती घोषित

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मुस्लीमांचे पवित्र स्थळ असलेल्या मक्का येथील हाज यात्रेत यंदा 98 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. असह्या उष्णतेमुळे त्यांच्यापैकी बहुतेकांना मृत्यू आला, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र विभागाकडून देण्यात आली आहे. यावेळी भारतातून या यात्रेला आतापर्यंत 1 लाख 75 हजार मुस्लीम पोहचले आहेत. यात्रा अद्यापही सुरु असल्याने आणखी लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. मृत भारतीय हाज यात्रेकरुंची राज्यनिहाय संख्या अद्याप देण्यात आलेली नाही.

Advertisement

मक्केचे तापमान यावेळी जवळपास 52 डिग्री सेल्शियस इतके आहे. गेल्या 100 वर्षांमधील हे सर्वाधिक तापमान मानले जात आहे. त्यामुळे उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरुंची संख्या आतापर्यंत 1 हजार 81 पर्यंत गेली आहे. हा अधिकृत आकडा असला तरी प्रत्यक्षात मृतांची संख्या बरीच जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मक्केतील अल् मुसेम येथील आपत्कालीन केंद्रात अनेक यात्रेकरु, त्यांचे नातेवाईक बेपत्ता असल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. सौदी अरेबिया सरकारने अद्याप यंदाच्या उष्णतेच्या लाटेसंबंधी कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. मृतांमध्ये सर्वात जास्त संख्या इजिप्तच्या यात्रेकरुंची आहे.

मृतदेहांचे तेथेच दफन

हाजच्या यात्रेत मुस्लीमाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह त्याच्या देशात परत पाठविला जात नाही. मृतदेहाचे सौदी प्रशासनाकडून मक्केतच दफन केले जाते. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला आणि ते नेमके कोणत्या देशांचे होते याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होणे अशक्य असते. मृत झालेल्या व्यक्तीसमवेत आलेल्या नातेवाईकांना किंवा सहप्रवाशांनाही त्याच्या मृत्यूचा पत्ता लागत नाही, अशी स्थिती असल्याचे सांगितले जाते. यावेळी तापमान अतिशय उच्च असल्याने जीवितहानी अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात झाली असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनही व्यक्त करत आहे. यात्रेकरुंना आवश्यक ते औषधोपचार पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रस्त्याकडेला अनेक मृतदेह

अद्यापही मक्केच्या अनेक रस्त्यांच्या कडेला बेवारस मृतदेह पडून आहेत, अशी माहिती अनेक यात्रेकरुंनी दिली आहे. प्रशासनाने केलेल्या सूचना अनेक यात्रेकरु पाळत नाहीत. त्यामुळे त्यांचा धोका वाढतो. उघड्या डोक्याने उन्हात थांबू नका. छत्र्यांचा उपयोग करा. दुपारी 12 ते 4 या अधिक उन्हाच्या वेळेत बाहेर पडू नका. भरपूर पाणी प्या, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तथापि, यात्रेकरुंना ऐन उन्हातच बाहेर पडावे लागते. अन्यथा यात्रा लवकर संपत नाही. कित्येकांना मक्केत अनेक दिवस मुक्काम करावा लागतो, अशीही स्थिती असते. अनुमती न घेता आलेल्या अनधिकृत यात्रेकरुंची संख्या मोठी असल्याने प्रशासनावर प्रचंड ताण पडतो. त्यामुळे कित्येकदा सर्व यात्रेकरुंना पुरेशा सुविधा देणे अशक्य ठरते. प्रशासनाच्या या अडचणी यात्रेकरुंनी समजून घ्याव्यात असे स्पष्ट करण्यात आले.

यंदा 18 लाख यात्रेकरु

यंदाच्या हाज यात्रेत भाग घेतलेल्या मुस्लीमांची आतापर्यंतची संख्या 18 लाख इतकी आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यांच्यापैकी 16 लाख यात्रेकरु बाहेरच्या देशांमधून आले आहेत. मात्र, लक्षावधी यात्रेकरु पैसा वाचविण्यासाठी व्हिसा न काढताच येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्थिती कित्येकदा स्थानिक  यंत्रणांच्या हाताबाहेर जाते, असेही सौदी अरेबियाच्या प्रशासनाचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.