960 वेळा दिली ड्रायव्हिंग टेस्ट
वृद्धत्वात मिळाले ड्रायव्हिंग लायसेंस
आमच्या देशात तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसेंस मिळविण्याचे काम वेळखाऊ वाटत असेल तर तुम्ही एका महिलेचा किस्सा जाणून घेणे गरजेचे आहे. या महिलेने ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी 18 वर्षांचा कालावधी घेतला आहे. ही महिला आपल्या देशातील नाही. या महिलेला 960 वेळा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागली, त्यानंतरच तिला स्वतःचे ड्रायव्हिंग लायसेन्स मिळू शकले आहे.
दक्षिण कोरियात ही घटना घडली आहे. तेथील चा सा सून नावाची महिला राजधानी सोलपासून 130 मैलाच्या अंतरावर राहते. या महिलेचा संयम आणि चिकाटी जाणून घेतल्यावर थक्क व्हायला होते. सर्वसामान्य व्यक्ती कुठलेही काम 8-10 प्रयत्नानंतर सोडून देतो. परंतु ही महिला दर आठवडय़ाला 5 वेळा ड्रायव्हिंग टेस्ट सलग तीन वर्षांपर्यंत देत राहिली. चिकाटी अन् मेहनत केल्यावर तिला अखेर स्वतःचे ड्रायव्हिंग लायसेंस मिळू शकले.
2005 मध्ये पहिल्यांदा दिली टेस्ट
चा सा सून यांनी 2005 मध्ये एप्रिल महिन्यात पहिल्यांदा ड्रायव्हिंग टेस्टसाठी लेखी परीक्षा दिली होती. यात अनुत्तीर्ण झाल्यावर त्यांनी 780 वेळा परीक्षा दिली आहे. आठवडय़ात दोनवेळा तिची परीक्षा होत राहिली. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर प्रॅक्टिकलचे सत्र सुरू झाले. प्रॅक्टिकलमध्ये यशस्वी ठरण्यासाठी त्यांना 10 वेळा प्रयत्न करावे लागले. एकूण 960 वेळा त्यांना परीक्षणांमधून जावे लागले आहे. चा सा सून यांचे वय आता 69 वर्षे असून त्यांना वाहन चालविण्यासाठी अनुमती मिळाली आहे.
11 लाख रुपयांचा खर्च
या महिलेने या पूर्ण प्रक्रियेत 11 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. या महिलेला भाजी विक्रीच्या व्यवसायासाठी ड्रायव्हिंग लायसेंस हवे होते. तिची कहाणी व्हायरल झाल्यावर दक्षिण कोरियन कंपनीने नवे वाहन प्रदान केले आहे. या वाहनाची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. या महिलेला वाहनविषयक जाहिरातीत स्थान देण्यात आले आहे. या महिलेला लायसेंस मिळाल्याचा सर्वाधिक आनंद तिच्या ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टरला झाला आहे.