जिल्ह्यात ग्राम पंचायत पोटनिवडणुकीसाठी 95 अर्ज
गावगाड्यात चुरस पहायला मिळणार : 23 रोजी होणार मतदान, 26 रोजी मतमोजणी
बेळगाव : जिल्ह्यात 46 ग्राम पंचायतमध्ये एकूण 48 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. आतापर्यंत 95 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवार दि. 15 रोजी माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. दि. 23 नोव्हेंबर रोजी मतदान तर 26 रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी आता गावगाड्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. तर 26 ग्राम पंचायतींमध्ये बिनविरोध निवड होणार असल्याची माहिती मिळाली आहे. विविध कारणांनी रिक्त झालेल्या ग्राम पंचायत सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली आहे. त्यामध्ये काही अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.
बेळगाव तालुक्यातील मारिहाळ, होनगा, बस्तवाड, बेकिनकेरे, बेनकनहळ्ळी, संतिबस्तवाड, कंग्राळी खुर्द, हुक्केरी तालुक्यातील मावनूर, घोडगेरी, शिरढाण, गुडस, चिकोडी तालुक्यातील केरुर, चंदूर, करोशी, नाईंग्लज, नेज, रायबाग तालुक्यातील निडगुंदी, अथणी तालुक्यातील शिरुर, शिरहट्टी, अरताळ, बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी, हन्नीकेरी, वन्नूर, गोवनकोप, मरकट्टी, सौंदत्ती तालुक्यातील हिरेकुंभ, रामदुर्ग तालुक्यातील हिरेकोप के. एच., कंदापूर, उदपुडी, गोडची, घटकनूर, कागवाड तालुक्यातील मंगसुळी, मोळे, मुडलगी तालुक्यातील मुन्याळ, यादवाड, निपाणी तालुक्यातील यमगर्णी, शेंडूर, कोगनोळी, खानापूर तालुक्यातील गुंजी, बिडी, जांबोटी, हलशी, हिरेमुनवळ्ळी, इटगी, घोडगाळी, गोकाक तालुक्यातील नंदगाव आदी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रामध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक होत आहे.
ग्राम पंचायत पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 23 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान होणार आहे. ग्राम पंचायत सदस्यपदाचा एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. काही ग्राम पंचायतींमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ग्राम पंचायत हा गावगाड्याचा राजकारणाचा एक भाग आहे. त्यामुळे मोठ्या ग्राम पंचायतींमध्ये चुरस पहावयास मिळत आहे.