जिल्ह्यात 13 वर्षात 94 पोलिसांचा ऑनड्युटी मृत्यू
कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
पोलिसाची नोकरी म्हणजे 24 तास ऑन ड्युटी... सण उत्सवकाळातही बंदोबस्तात असणारे पोलीस घरच्यांचा वाट्याला कधीतरीच येतात. निवृत्तीनंतर तरी आपला नवरा, आपले वडील आपल्या वाटणीला येतील अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पोलीस कुटूंबियांच्या पदरी मात्र निराशाच येत आहे. गेल्या 13 वर्षात 94 पोलीस अंमलदारांचा आणि 3 पोलीस अधिकाऱ्यांचा ऑनड्यूटी मृत्यू झाला आहे.
सध्या पोलीस दलाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्वी पोलीस ठाण्याची पायरी चढणे म्हणजे नागरिकांच्या छातीत गोळा येत होता. आता मात्र वाढत्या कामाच्या ताणामुळे पोलीसांच्या छातीत गोळा येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापूर जिह्यात टोलचे आंदोलन भडकल्यानंतर गेल्या 10 ते 15 वर्षापासून जिह्यात जमावबंदी लागू आहे. गेली तीन ते चार वर्षापासून पोटनिवडणूक, लोकसभा, विधानसभा, गोकुळ, राजाराम कारखाना या निवडणूकांमुळे पोलिसांवर सतत बंदोबस्ताचा ताण वाढत आहे. यामुळे नुकत्याच केलेल्या आरोग्य शिबीरामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
- आठ तासांची ड्यूटी करा
गृह विभागाने मुंबईमध्ये पोलीसांची ड्यूटी आठ तासांची केली आहे. मात्र राज्यात अन्यसर्वच ठिकाणी पोलिसांची ड्यूटी 12 तासाची आहे. मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूरमध्येही 8 तासांची ड्यूटीचे नियोजन करता येणे शक्य होईल. मात्र्घ् यासाठी 30 वर्षापासून रखडलेला आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. कोल्हापूरामध्ये आयुक्तालय झाल्यास पोलीस दलाची अधिकारी, कर्मचारी संख्या वाढणार आहे.
- वारसांना नोकरी दिली
कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना पोलीस दलात नोकरी देण्यात येते. गेल्या 13 वर्षात ऑनड्यूटी मृत्यूमुखी पडलेल्या 94 पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना पोलीस दलामध्ये कर्तव्यामध्ये सामावून घेण्यात आले आहे. याचसोबत पोलिसांच्या कुटूंबियांना त्यांच्या हक्काची विम्याची व इतर देणेही तात्काळ देण्यात आली आहेत.
- तणाव कमी करण्यासाठीच रजेची सक्ती
पोलीस ठाण्याचे काम, बंदोबस्त, यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. यातून कर्मचारी आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवू शकत नाही आहे. आगामी काळात गणेशोत्सव, जिल्हापरिषद, महापालिकेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येवू घातल्या आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसाठी अर्जित व प्रवासी रजांचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
योगेशकुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक
- ऑनड्युटी पोलिसांच्या मृत्यूची गत 13 वर्षातील आकडेवारी
वर्ष पुरुष महिला
2013 10 0
2014 08 0
2015 06 0
2016 08 1
2017 09 0
2018 09 0
2019 01 1
2020 12 1
2021 09 0
2022 02 0
2023 03 0
2024 08 0
2025 (जुन) 04 1
एकूण 89 5
पोलीस अधिकारी
2019 1
2020 1
2023 1
एकूण 3