Miraj Crime : मिरजेत व्यापाऱ्याला 90 लाखांचा गंडा; गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
मिरजेत मोठी आर्थिक फसवणूक; ९० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर डल्ला
मिरज : कंपनीमध्ये भागभांडवल गुंतवणूक करण्यास सांगून येथील व्यापाऱ्याला एक कोटी, ४० लाख, ७० हजार रुपये गुंतविण्यास सांगून तब्बल ९० लाख, ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याबाबत दिवेश जाधवजी रुपारेल (वय ४५, रा. कुमार रेसिडेन्सी, फ्लॅट नं. ४०३, कॉलेज कॉर्नर, टीव्हीएस शोरुमच्या पाठीमागे, सांगली) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित राजेश तुळसीदार नाखुजा (बय ४५, रा. घाटकोपर, मुंबई) आणि विजय मंगे (वय ४६, रा. वाशी, मुंबई) अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दिवेश रुपारेल हे व्यापारी असून, सांगली-मिरज रस्त्यावर वें त्र्न्सर हॉस्पिटलच्या पाठीमागे कंपनी आहे. संबंधीत संशयीत राजेश नाखुजा आणि विजय मंगे हेही व्यवसायिक असून, ते दिवेश रुपारेल यांच्या संपर्कात होते. राजेश याची मेक इंडिया इम्पेक्स व विजय मंगे याची श्री सद्गुरुकृपा शिपींग एजन्सी नावाने कंपनी
आहे. सदर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संशयीतांनी दिवेश रुपारेल यांना प्रवृत्त केले. व्यवसायिक भागिदारीतून त्यांचा विश्वास संपादन करत गुंतवणुकीसाठी एक कोटी, ४० लाख, ७० हजार रुपये घेतले.
मात्र, काही दिवसानंतर दिवेश रुपारेल यांनी पैशांची परत मागणी केली. त्यानंतर संशयीतांनी त्यांना ५० लाख रुपये परत दिले. मात्र उर्वरीत ९० लाख, ७० हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. रुपारेल यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिवेश रुपारेल यांनी गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणीतील दोघेही संशयीत मुंबई येथील असून, त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत. व्यवसायिक भागिदारीतून गुंतवणूक केलेल्या ९० लाख हून अधिक रक्कमेवर भामट्यांनी डल्ला मारल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.