For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकातील 9 ट्रेकर्सचा उत्तराखंडमध्ये मृत्यू

06:45 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकातील 9 ट्रेकर्सचा उत्तराखंडमध्ये मृत्यू
Advertisement

खराब हवामानामुळे सहस्त्रताल येथे अडकून पडले टेकर्स : 22 पैकी 13 जणांचा बचाव

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

उत्तराखंड येथे टेकिंगसाठी गेलेले 22 जण अडकून पडले आहेत. त्यात कर्नाटकातील 18 जणांचा समावेश असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, अडकून पडलेल्यांचे बचावकार्य सुरू असून मदतकार्याची जबाबदारी राज्याचे महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांच्यावर सोपविण्यात आली असून बुधवारी दुपारी ते डेहराडूनला रवाना झाले. अडकलेल्या 4 ट्रॅकर्सची सुटका सुरू करण्यासाठी बुधवारी दिवसभर मोहीम सुरू होती, मात्र खराब हवामानामुळे मोहीम राबविण्यात अडचण येत होती. मात्र, दिवसअखेर 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील 4,400 मीटर उंचीवरील सहस्त्रताल येथे माऊंटेनियरिंग फौंडेशनकडून ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. या संघात कर्नाटकातील 18, महाराष्ट्रातील एक तसेच तीन स्थानिक गाईड्सच समावेश आहे. मात्र, मंगळवारी सायंकाळी खराब हवामानामुळे येथे कर्नाटकातून गेलेल्या 18 जणांसह एकूण 22 जण अडकून पडले. स्थानिक हेलिकॉप्टर आणि सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करून अडकून पडलेल्या ट्रेकर्सना सुरक्षितस्थळी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 13 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात बचावकार्याला यश आले आहे. उर्वरित चौघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. अत्यवस्थ झालेल्या तिघांना नतीन भटवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती स्थिर आहे.

गढवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली बचावकार्य राबविण्यात येत आहे. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंगळवार 4 जून रोजी हिमवर्षाव आणि दाट धुक्यांमुळे ट्रेकर्स ग्रुप अडकून पडला. याविषयी ट्रेकिंग असोसिएशनने माहिती दिली होती. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. एसडीआरएफ, उत्तराखंड पोलीस, वनखाते, सैन्यदल आपत्ती व्यवस्थापन पथक आणि सिल्ला गावातील लोकांकडून बचावकार्य राबविण्यात येत आहे.

सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न

उत्तराखंडमधील सहस्त्रताल येथे टेकिंगसाठी गेलेल्या पाच ट्रेकर्सच्या खराब हवामानामुळे मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शोक व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. उत्तराखंड येथे अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे ट्रेकला गेलेल्या राज्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऐकून   दु:ख झाले. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. बचाव मोहिमेद्वारे 11 लोकांना सुरक्षित ठिकाणी परत आणण्यात आले असून अजून काही ट्रेकर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. आमचे सरकार सर्वांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडच्या डेहराडूनला ट्रेकिंगसाठी गेलेल्या कर्नाटकातील 9 जणांचा प्रतिकूल हवामानामुळे मृत्यू झाल्याची माहिती महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मी डेहराडून येथील गेस्टहाऊसमध्ये 8 जणांच्या गटाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. बचाव कार्यात सहभागी असलेल्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मृत्यू झालेले सर्व 9 मृतदेह (सध्या 5 उत्तरकाशीमध्ये आणि 4 अजूनही मार्गात आहेत) डेहराडूनला नेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे. मृतदेह लवकरात लवकर बेंगळूरला आणण्याची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.