मार्कंडेय कारखान्यात 9 हजार टन ऊस गाळप
बेळगावकरांना मार्कंडेय कारखान्यातील साखरेची चव चाखता येणार : अडीच ते तीन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : शेतकऱ्यांसाठी विविध शिबिरे भरविणार
वार्ताहर /काकती
मार्कंडेय साखर कारखान्यात साखर तयार करण्यात येत आहे. यामुळे बेळगावकरांना बेळगावच्या कारखान्यातील साखरेची चव चाखता येणार आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाने या साखर कारखान्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. सध्या साखर कारखान्यात उसाचे गाळप जोमाने सुरू आहे. यामुळे बेळगावसह खानापूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा साखर कारखाना उपयोगी ठरत आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी साखर कारखान्यात यंदाच्या गाळप हंगामाला सुरुवात करण्यात आली. पंधरा दिवसामध्ये 9 हजार टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तसेच कारखान्यात बनविलेल्या साखरेच्या पोत्यांचे पूजन मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन तानाजी पाटील, व्हाईस चेअरमन आर. आय. पाटील, कारखान्याचे मुख्य अधिकारी लोकरे, शिवाजी भातकांडे, जायकण्णावर व संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले.
याप्रसंगी संचालक जोतिबा आंबोळकर, बसवंत मायाण्णाचे, शिवाजी कुट्रे, सिद्धाप्पा टुमरी, बाबुराव पिंगट, सुनिल अष्टेकर, बसवराज गाणगेर, लक्ष्मण नाईक, वसुधा म्हाळोजी, वनिता अगसगेकर, चेतक कांबळे आदी उपस्थित होते. सर्व संचालकांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना भेटून या कारखान्याला अधिकाधिक ऊस पाठविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चेअरमन तानाजी पाटील यांनी केले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यापुढे लागवड, आंतरमशागत, खताचा डोस या संदर्भात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. बेळगावात उसाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेण्यात येत आहे. मार्कंडेय कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले असून त्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात आली आहेत, असे दिसून येत येत आहे. यंदा अडीच ते तीन लाख टन ऊस गाळप क्षमतेचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. यासाठी उस उत्पादन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही संचालक मंडळाने केले आहे. या कारखान्यात उसाचे गाळप करून साखरेसाठी प्रक्रिया करून साखर बनविण्यात येऊ लागली आहे.
शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य करावे - पुंडलिक पावशे
बेळगाव तालुक्यात अलीकडे उसाचे उत्पादन वाढले आहे. अन्य पिकांच्या तुलनेत ऊसपीक शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरु लागले आहे. सध्या तालुक्याच्या सर्रास भागात ऊस तोडणीचे कामे जोमाने सुरू झाली आहे. बेळगावातील व आपल्या हक्काचा कारखाना शेतकऱ्यांसाठी हवा आहे, मार्कंडेय साखर कारखान्यात यंदा ऊस गाळपाचे उद्दिष्ट अधिक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी कारखाना सोयीस्कर ठरणार आहे. सोमवार दि. 20 रोजी सायंकाळपर्यंत कारखान्यामध्ये 9 हजार टन इतका ऊस गाळप करण्यात आला आहे. पुढील गाळपासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस या कारखान्याला पाठवून सहकार्य केले पाहिजे.