अट्टल दुचाकी चोरट्याकडून चोरीच्या 9 मोटारसायकली जप्त
एपीएमसी पोलिसांनी लावला तपास
बेळगाव : एका अट्टल दुचाकी चोराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 2 लाख 65 हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. संतोष बसवराज अंदानी (वय 45) राहणार बनगार गल्ली, गोकाक असे त्याचे नाव आहे. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी, उपनिरीक्षक एस. आर. मुत्तत्ती, एम. ए. पाटील, दीपक सागर, बसवराज नरगुंद, खादरसाब खानमन्नावर, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींनी ही कारवाई केली आहे. केएलई कॅन्सर इस्पितळाजवळून मोटारसायकलची चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना संतोषला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याने दोन हिरोहोंडा स्प्लेंडर, तीन होंडा अॅक्टिव्हा, एक सीबीझेड एक्स्ट्रीम, एक बजाज पल्सर, एक हिरो पॅशन प्रो, एक बजाज सीटी 100 अशा एकूण 9 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.