नक्षलवादी हल्ल्यात 9 पोलीस हुतात्मा
छत्तीसगडमधील घटना, भूसुरुंग स्फोटाने उडविले वाहन, अत्याधुनिक स्फोटकांचा वापर
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगड राज्याच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या एका गटाने स्फोट घडवून पोलिसांचे एक वाहन उडवून दिले आहे. या घटनेत आतापर्यंत 9 पोलीस हुतात्मा झाले असून काहीजण गंभीर आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्फोटासाठी नक्षलवाद्यांनी अत्याधुनिक स्फोटकांचा उपयोग केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.
बिजापूर जिल्ह्यातील बेद्रे-कुत्रू मार्गावर नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरली होती. पोलिसांना घेऊन जाणारे वाहन या मार्गावरुन जात असताना ही स्फोटके उडविण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या वाहनाचा चक्काचूर झाला. वाहनात 14 पोलीस होते, अशी माहिती देण्यात आली. त्यांच्यातील 9 जण जागीच मृत्युमुखी पडले. तर पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
उपमुख्यमंत्र्यांचा निर्धार
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साव यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. पोलिसांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची सुनिश्चितता राज्य सरकारकडून केली जाईल. ही घटना घडली, त्या भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून हल्लेखोर नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
अभियानाला यश
छत्तीसगडमध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांच्या नेतृत्वात नक्षलवादाला समूळ उखडण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या अंतर्गत आतापर्यंत अनेक नक्षलींना यमसदनी धाडण्यात आले आहे. जेव्हा राज्य सरकार असे अभियान हाती घेते, तेव्हा दबावाखाली आलेले नक्षलवादी त्यांचे अस्तित्व दाखविण्यासाठी अशा प्रकारचे भ्याड हल्ले करीत असतात. तथापि, राज्य सरकार कोणत्याही दबावात न येता आपले अभियान पूर्ण करणार आहे. नक्षलवादाला यापुढे राज्यात स्थान राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
शनिवारी 5 नक्षली ठार
गेल्या शनिवारी राज्याच्या बस्तर जिल्ह्यात एका चकमकीत सुरक्षा दलांकडून पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. बस्तरच्या वनविभागात याच घटनेचा सूड म्हणून सोमवारचा स्फोट घडवून आणण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते. तथापि, नक्षलींनी कितीही आव आणला, तरी त्यांचा नायनाट केला जाईल, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या चकमकीला शनिवारी पहाटेपासून प्रारंभ झाला होता. ती दुपारपर्यंत चालली होती. या पाचपैकी चार नक्षलींचे मृतदेह रविवारी सापडले होते. तसेच आणखी एकाचा मृतदेह रविवारी दुपारी हाती लागला होता. या चकमकीत दंतेवाडा येथील पोलीस स्थानकाचा एक कॉन्स्टेबल सन्नू कराम यालाही हौतात्म्य प्राप्त झाले होते.
नारायणपूरमध्येही अभियान
राज्य सरकारने नक्षलींच्या विरोधात राज्याच्या नारायणपूर-दंतेवाडा भागातही नक्षली आणि माओवादी यांच्या विरोधात अभियानाचा प्रारंभ केला. या भागातील दक्षिण आबुजमार वनविभागात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा सैनिक आणण्यात आले आहेत. विशेष कृती दलाच्या या सैनिकांनी हा सारा वनभाग पिंजून काढण्यास प्रारंभ केला असून हा भाग लवकरच नक्षलमुक्त होईल, असा विश्वास बस्तरच्या पोलीस महानिरीक्षकांनी व्यक्त केला. हे अभियान जिल्हा संरक्षक दलाच्या साहाय्याने हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारीही राज्याच्या गारियाबाद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 3 नक्षलींना संपविण्यात आले होते. आतापर्यंत गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेक नक्षलींना टिपण्यात आल्याने नक्षलींचा हालचाली मंदावल्या असल्याचे दिसून येते. हे अभियान किमान एक वर्षभर चालणार असून हा भाग नक्षलमुक्त केला जाईल, असे प्रतिपादन प्रशासनाने केले.