काळ्या दिनाच्या खटल्यातील म. ए. समितीच्या 9 जणांना जामीन
बेळगाव : काळ्या दिनानिमित्त 1 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मूक सायकल फेरीवेळी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा देण्यासह कर्नाटक विरोधी घोषणा देणे व भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवत मार्केट पोलिसांनी समिती नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातील नऊ जणांना शुक्रवार दि. 24 रोजी जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 18 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, नगरसेवक रवी साळुंखे, अंकुश केसरकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी नगरसेवक गजानन पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.
दरवर्षीप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर 2023 रोजी शहरात काळ्यादिनाचे आयोजन करण्यात आले होते. मूक सायकल फेरीवेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यासह कर्नाटक विरोधी घोषणा देऊन भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत मार्केट पोलीस स्थानकात समिती नेते व कार्यकर्ते अशा एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या खटल्याची जेएमएफसी द्वितीय न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील नऊ जणांना जामीन मंजूर करावा असा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. वरील सर्वांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. अश्वजीत चौधरी यांनी काम पाहिले. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर उपस्थित होते.