साडेचार लाखाचा 9 किलो 170 ग्रॅम गांजा जप्त
कारवार : ओडिसाहून होन्नावर मार्गे भटकळकडे कारमधून वाहतूक करण्यात येणारा 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा 9 किलो 170 ग्रॅम इतका गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी कारचालकासह तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य एक व्यक्ती फरार झाली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई भटकळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तेंगीनगुंड्डी येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर भटकळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नवीन एस. नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे, सय्यद अक्रम मोहम्मद हुसेन (वय 24, रा. सेंट्रल लॉजच्या पाठीमागे, भटकळ), अब्दुल रेहमान सलीमसाब शेख (वय 27, रा. गुलमे, भटकळ) आणि कारचालक अझरुद्दीन मोहम्मद साब (रा. शिरसी) अशी. फरार होण्यात यशस्वी ठरलेल्या व्यक्तीचे नाव कासीम अबुमोहम्मद (रा. उसमान नगर, दुसरा क्रॉस, भटकळ) असे आहे.
विश्वसनीय सुत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भटकळ पोलिसांनी ओरीसाहून होन्नावर मार्गे भटकळकडे निघालेल्या ह्युंडाई कारची तपासणी केली असता कारमध्ये साडेचार लाख रुपये किमतीचा 9 किलो 170 ग्रॅम गांजा आढळून आला. गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार ही जप्त करण्यात आली आहे. कारवार जिल्हा पोलिस प्रमुख एम. नारायण, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख सी. टी. जयकुमार आणि भटकळचे डीवायएसपी महेश एम. के. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत सीजीआय गोपाळ कृष्ण, उपनिरीक्षक गोविंद नाईक आदी सहभागी झाले होते. भटकळ शहर पोलिस अधिक पतास करीत आहेत.