मोठा नफा देण्याच्या आमिषाने 89 लाखांची फसवणूक
फसलेल्या 10 जणांची पोलिसात धाव : कंपनी थाटलेल्या चौघांविरुद्ध तक्रार : इतर गुंतवणूकदारही हादरले
बेळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे सांगून सावजांना ठकवण्याचे सायबर गुन्हेगारांचे प्रकार सुरूच आहेत. बेळगाव येथेही एका कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात गंडविल्याचे उघडकीस आले असून यासंबंधी फशी पडलेल्या गुंतवणूकदारांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. सुमारे 89 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. फसवणुकीच्या या प्रकाराने एकच खळबळ माजली असून इतर गुंतवणूकदार हादरून गेले आहेत. वडगाव येथील सुभाष पुन्नाप्पा चव्हाण व इतर नऊ जणांनी दिलेल्या फिर्यादीवरून एपीएमसी पोलीस स्थानकात चौघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत: पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
शाहूनगर परिसरात एटर्निया कंपौंड व्हेंचर्स नामक कंपनी उघडून या कंपनीत गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे सांगण्यात आले होते. इनायत मुल्ला यांना फायदा झाला आहे, असे सांगत इतरांनाही विश्वासात घेण्यात आले. त्यामुळे आपण स्वत: 10 लाख रुपये, आपली पत्नी संगीता हिच्या नावे 10 लाख रुपये, इनायत मुल्ला यांनी 22 लाख रुपये, जोतिबा झेंडे यांनी 5 लाख रुपये, मुनीर सुंदरगी यांनी 15 लाख रुपये, साजिद शेख यांनी 4 चार लाख रुपये, आयुबखान सौदागर यांनी 2 लाख रुपये अशी एकूण 89 लाख रुपये गुंतवणूक केली आहे. नफा तर नाहीच, गुंतवणूक केलेले पैसेही परत देण्यात आले नाहीत, असे सांगत सुभाष चव्हाण यांनी चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
सीईएन पोलिसांकडूनही प्रकरणाचा तपास
फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मारुती सुतार यांच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांनी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सुरुवातीला सीईएन पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास करण्यात आला. बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी एपीएमसी पोलीस स्थानकात चौघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.