महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कमी हजेरीमुळे ‘डीएमसी’चे 88 विद्यार्थी अडचणीत

11:42 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॉलेजने परीक्षा देण्यास परवानगी नाकारली : हजेरी 75 टक्के भरण्यात विद्यार्थी अपयशी,अभाविपकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न जारी

Advertisement

पणजी : आसगांव - म्हापसा येथील डीएमसी कॉलेजमधील प्रथम वर्षाचे 88 विद्यार्थी हजेरी 75 टक्के न भरल्याने परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार त्यांची 75 टक्के हजेरी भरली नसल्यामुळे त्यांना परीक्षेला बसण्याची अनुमती नाकारण्यात आली असून वर्ष वाया जाण्याच्या भितीने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी अशी विनंती कॉलेजकडे करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थी, त्यांचे पालक यांनी अभाविप, एनएसयूआय या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्राचार्य दिलीप आरोलकर यांची भेट घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांच्या भवितव्याचा विचार कऊन तोडगा काढावा आणि त्यांना परीक्षेची संधी द्यावी, अशी विनंती पालकवर्गाने प्राचार्यांकडे केली आहे.

Advertisement

विद्यार्थी, पालकांचे अक्षम्य दुर्लक्ष : आरोलकर

या प्रकरणी आरोलकर यांनी सांगितले की, गोवा विद्यापीठाच्या नियमानुसार वर्गात 75 टक्के हजेरी बंधनकारक आहे. ती नसेल तर परीक्षेला बसता येत नाही. याची माहिती पालक तसेच संबंधित विद्यार्थी यांना होती आणि त्यांना तशी सूचनाही देण्यात आली होती. तथापि त्याकडे विद्यार्थी तसेच पालकांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे आरोलकर म्हणाले. गैरहजर राहिल्यास त्याचे कारण देणे किंवा स्पष्टीकरण देणे आवश्यक असते. आजारी असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे असते. त्यानुसार सूट मिळते. परंतू संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी काहीच कळवले नसल्याचे आरोलकर यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्याची हजेरी कमी आहे, त्यांना त्याचे स्पष्टीकरण लेखी देण्याची सूचना करण्यात आली असून ते सर्व विद्यापीठाकडे पाठवले जाणार आहे. शेवटी अंतिम निर्णय विद्यापीठ घेणार असल्याचे आरोलकर यांनी सांगितले. सर्व शाखांतील मिळून प्रथम वर्षाच्या सुमारे 88 जणांना परीक्षा नियमानुसार नाकारण्यात आली आहे. ज्यांची हजेरी कमी आहे त्यांचे क्रमांक जाहीर कऊन त्यांना परीक्षेला बसण्याची मनाई करणारी नोटीस जारी करण्यात आली आहे.

अभाविपची मध्यस्थी

गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ महासचिव आणि अभाविप उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक यांनी डीएमसी कॉलेजचे प्राचार्य दिलीप आरोलकर यांना नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्या तक्रारींसह अभाविपशी संपर्क साधला होता. कॉलेजने 75 टक्केपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास बंदी घातली आहे असून त्यांना पूर्ण वर्ष पुन्हा बसण्याबाबत नोटीस बजावली आहे. याची दखल घेऊन पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा विचार करावा आणि त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, अशी विनंती अभाविपने गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांनासुद्धा केली आहे. उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक म्हणाले, आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत, पण एनईपी आणि विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या कॉलेजच्या निर्णयाशीही आम्ही सहमत आहोत. प्राचार्यांसह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्षभर उपस्थितीबद्दल माहिती देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या बाजूनेही थोडे दुर्लक्ष केले जाते, परंतु महाविद्यालयाच्या नियमांबद्दल अननुभवी असल्याने त्यांना पूरक परीक्षा पर्याय दिला जावा. आम्ही विद्यापीठालासुद्धा याची दखल घेण्याची विनंती करणार आहोत, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article