8600 वर्षे जुना ब्रेड
अद्याप गोल अन् स्पंजी
पुरातत्व तज्ञांनी जगातील सर्वात जुना ब्रेड शोधून काढला आहे. हा ब्रेड 8600 वर्षे जुना आहे. दक्षिण तुर्कियेच्या कोन्या प्रांतातील एक पुरातत्व स्थळ कॅटलहोयुकमध्ये हा ब्रेड मिळाला आहे. हा शोध ख्रिस्तपूर्व 6600 सालातील असून ब्रेड कच्चा आणि फर्मेंटेड स्थितीत आढळून आला आहे.
ब्रेडचे अवशेष ‘मेकन 66’ नावाच्या क्षे‰ात आंशिक स्वरुपात नष्ट झालेल्या ओव्हननजीक आढळून आले आहेत. हा ओव्हन प्राचीन मातीच्या विटांनी तयार करण्यात आलेल्या घरांनी घेरला गेला होता. तुर्कियेच्या नेकमेट्टिन एर्बाकन युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च अँड अॅप्लिकेशन सेंटरनुसार हा ब्रेड अत्यंत गोल असून स्पंजी आहे. विश्लेषणाच्या माध्यमातून याची ओळख पटविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कॅटालहोयुकमध्ये मिळालेला हा जगातील सर्वात जुना ब्रेड आहे. हा एका पाव रोटीची छोटी आवृत्ती आहे. या ब्रेडच्या मधोमध बोटाने दाब देण्यात आला होता. हा ब्रेड फर्मेंटेड करण्यात आला होता आणि यातील स्टार्च अद्याप जिवंत आहे. आजवर अशाप्रकारचे उदाहरण दिसून आले नसल्याचा दावा अनादोलु विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक तसेच पुरातत्व तज्ञ अली उमुट तुर्कान यांनी केला आहे.
स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपद्वारे मिळालेल्या छायाचित्रांनुसार ब्रेडच्या आत स्टार्चचे कण दिसून आले आहेत. तुर्कियेत गाजियांटेप विद्यापीठाचे बायोलॉजिस्ट सलीह कावाह यांनी या ब्रेडच्या निर्मितीसाठी आटा आणि पाण्याचा वापर करण्यात आला होता असे सांगितले आहे.