For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापुरातील 8600 जण सैन्य दलात

12:33 PM May 13, 2025 IST | Radhika Patil
कोल्हापुरातील 8600 जण सैन्य दलात
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्यामधील 8 हजार 629 जण भारतीय सैन्य दलात आहेत. यामधील बहुतांशी वरिष्ठ पदाधिकारी असून जवनांसह प्रमुख विभागात सेवा बजावत आहेत.आतापर्यंत झालेल्या युद्धासह अन्य मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 180 जण हुतात्मा झाले आहेत.

जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. यावर भारताने हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यास सुरू केले. यानंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ले सुरू झाले. भारतानेही पाकिस्तानवर प्रति हल्ले सुरू केले. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. देशातील सुट्टीवर गेलेल्या सैनिकांना पुन्हा सैन्य दलात बोलवण्यात आले. सध्या दोन्ही देशाकडून शस्त्रसंधीचा निर्णय झाला असला तरी तणाव कायम आहे.भारतीय सैन्य दलाच्या या मोहिमेमध्ये कोल्हापुरातीलही जवानांचा समावेश आहे.

Advertisement

देशावर कोणतेही संकट आले तर कोल्हापूरकर या संकटाचा सामना करण्यासाठी नेहमीच अग्रभागी असतात. यापूर्वी झालेल्या युद्ध असो की महापूर, कोरोना यामधून हे स्पष्ट झाले आहे. भारतीय सैन्य दलामध्ये सुमारे 37 लाख 73 हजार 300 सैनिक आहेत. यामध्ये 13 लाख 25 हजार नियमित सैनिक तर 11 लाख 55 हजार सैनिक राखीव आहेत. 12 लाख 93 हजार 300 निमलष्करी सैनिक आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सैन्य दलात 8 हजार 629 जणांचा समावेश आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हे सर्वजण स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या हल्ल्यामध्ये कोल्हापुरातील जवानांचाही समावेश आहे. 1962 पासून आतापर्यंत कोल्हापुरातील 180 जवान शहीद झाले आहेत. यामधील अनेक जवान भारत-पाकिस्तान व भारत-चीनच्या सीमेवर शत्रूशी लढताना धारातीर्थी पडले आहेत. यामध्ये शहीद जवान अभिजित सूर्यवंशी (कोल्हापूर),जवान दिगंबर उलपे (कसबा बावडा),जवान नारायण तुपारे (कार्वे, ता. चंदगड),जवान महादेव तुपार (महिपालगड, ता. चंदगड), जवान सावन माने (गोगवे, ता. शाहूवाडी), प्रवीण येलकर (भैरेवाडी, ता. आजरा), अनंत धुरी (बेलेभट, ता. चंदगड) आदींचा समावेश.या हुतात्मा जवानांचे बलिदान आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

कोल्हापूरचे वीर लष्करात मोठ्या हुद्यावर जाऊन देशसेवा करण्याची परंपरा आहे. कोल्हापूरचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल (कै.) एस.पी.पी.थोरात यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली आहे. याचबरोबर मेजर जनरल शिवाजीराव पाटील (कसबा वाळवे, ता. राधानगरी), मेजर जनरल ए. बी. सय्यद (ताराबाई पार्क, कोल्हापूर), मेजर जनरल मधुकर काशीद (आर. के.नगर, कोल्हापूर), मेजर जनरल उदयकुमार उपाध्ये (न्यू पॅलेस परिसर, कोल्हापूर), ब्रिगेडीअर विजयसिंह घोरपडे (साईक्स एक्स्टेंशन, कोल्हापूर), ब्रिगेडीअर उदय थोरात (कसबा बावडा रोड, कोल्हापूर) यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. तसेच देशासाठी हुतात्मा झालेल्या कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हुतात्मा कर्नल जयवंत व्ही. महाडिक (कोल्हापूर) व हुतात्मा मेजर सत्यजित शिंदे (कोल्हापूर) यांचाही समावेश आहे. एकूणच कोल्हापूरकर देशावर आलेल्या संकटावेळी नेहमीची अग्रभागी असतात, हे दिसून येते.

  • सैनिक कल्याण मंडळाची स्थापना

कोल्हापूर जिह्यात माजी सैनिक, विधवा, अवलंबित 20 हजार 456 असून जिह्यातील आजी माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण मंडाळाची स्थापना करण्यात आली आहे. माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या अवलंबितांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे. यामध्ये आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा,शिक्षण आणि रोजगार यासारख्या योजनांचा समावेश होतो.

  • ध्वज निधी संकलनामध्ये कोल्हापूर टॉपमध्ये

कोल्हापूरकर मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतात. ध्वज निधी संकलनामध्ये नेहमी कोल्हापूर टॉपमध्ये असते. 2023 मध्ये इष्टांकाच्या 124 टक्के म्हणजेच एकूण 2 कोटी रूपये ध्वजदिन निधी संकलन झाले. 2024 चे निधी संकलन सुरू असून 1 कोटी 80 लाखांचा उद्दिष्ट आहे. यातील एप्रिल 2025 अखेर 94 लाख रुपये संकलन झाले आहे.

विधानसभा मतदार संघ                           सैनिकाची संख्या

चंदगड                                                                    2111

राधानगरी                                                                1108

कागल                                                                    1725

कोल्हापूर दक्षिण                                                        508

करवीर                                                                  681

कोल्हापूर उत्तर                                                        95

शाहूवाडी                                                             1245

हातकणंगले                                                          406

इचलकरंजी                                                          151

शिरोळ                                                              591

Advertisement
Tags :

.