Kagal Crime : जमिनीच्या वादातून 81वर्षीय वृद्धास कागल ग्रामीण रुग्णालयात मारहाण
कागलमध्ये जमिनीच्या वादात हाणामारी
कागल : शेत जमिनीच्या वादातून ८१ वर्षाच्या वृद्धास कागल येथील ग्रामीण रुग्णालय आवारात मारहाण करण्यात आली. तर याच प्रकरणात मौजे सांगाव येथे महिलेचा विनयभंग करून मारहाण करण्यात आली. याबाबत शंकर गणपती निर्मळे (वय ८१) व विजया निवृत्ती निर्मळे (वय ४५) यांनी या परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.
शंकर निर्मळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आपणास विजया निर्मळे व सुवर्णा निर्मळे यांनी डोळ्यात चटणी फेकली व त्यावेळी शुभम निर्मळे व विक्रम निर्मळे यांनी मारहाण केली. त्यानंतर शुभम निर्मळे व कल्पना निर्मळे यांनी कागलच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेले फिर्यादीनुसार विजया निर्मळे, सुवर्णा निर्मळे, कल्पना निर्मळे, नंदा निर्मळे, संभाजी निर्मळे, शुभम निर्मळे, विक्रम निर्मळे व निवृत्ती
निर्मळे (सर्व रा. मौजे सांगाव) यांच्याविरुद्ध कागल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, विजया निर्मळे यांनी दिलेले फिर्यादीनुसार, बडिलोपार्जित जमिनीसाठी गेली २८ वर्षे शंकर निर्मळे व एकनाथ निर्मळे यांच्या विरोधात न्यायालयात दावा सुरू होता. त्यानुसार २८ मार्च २०२५ रोजी कब्जा मिळाला आहे. १३ नोव्हेंबर रोजी ऊसाला तोड येणार माहित असतानासुद्धा शंकर निर्मळे व मारुती पाटील यांनी शेतात पाणी सोडले. त्यामुळे ऊस तोडणी थांबली. १७ नोव्हेंबर रोजी शंकर निर्मळे यांना तुम्ही शेतात पाणी का सोडले ? असे विचारत असताना त्यांनी आम्हाला शेतात पाय ठेवायचे नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. गावातील कृष्णात पाटील व इतरांना फोन करून बोलून घेतले. यावेळी कृष्णात पाटील व दिग्विजय पाटील, चंद्रदीप पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर राम पाटील यांनी काठीने मारले. राम पाटील यांनी विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले.