For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोटनिवडणुकीत 81.84 टक्के मतदान

06:44 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोटनिवडणुकीत 81 84 टक्के मतदान
Advertisement

शिग्गाव, चन्नपट्टण, संडूर विधानसभा मतदारसंघांचा निकाल 23 रोजी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील चन्नपट्टण, शिग्गाव आणि संडूर विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. तिन्ही मतदारसंघांमध्ये सरासरी 81.84 टक्के मतदान झाले. चन्नपट्टणमध्ये सर्वाधिक 88.80 टक्के मतदान झाले. शिग्गावमध्ये 80.48 टक्के तर संडूरमध्ये 76.24 टक्के मतदान झाले. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचारात गुंतलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विश्रांती घेणे पसंत केले असले तरी निकालाविषयी गोळाबेरीज सुरू आहे.

Advertisement

माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, बसवराज बोम्माई आणि ई. तुकाराम यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या रामनगर जिल्ह्यातील चन्नपट्टण, हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव आणि बळ्ळारी जिल्ह्यातील संडूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती.

बुधवारी तिन्ही मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच चुरशीने मतदान झाले. सायंकाळी 5 नंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. भाजप-निजद युती आणि काँग्रेसमध्ये लढती रंगल्या. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून राजकीय नेत्यांनी उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले होते. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तिन्ही मतदारसंघांमध्ये सज्जता केली होती. कोठेही अनुचित घटना घडू नयेत यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील मतदारांमध्येही अधिक उत्साह दिसून आला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. मतदानाची वाढलेले टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडेल, याविषयी राजकीय वर्तुळात खलबते सुरू झाली आहेत.

चन्नपट्टण विधानसभा मतदारसंघात एकूण 2,06,866 मतदारांनी आपला हक्क बजावला. या मतदारसंघात 276 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. या ठिकाणी विक्रमी 88.80 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यशवंत गुरुकर यांनी दिली.

शिग्गावमध्ये 2,37,525 मतदारांपैकी 1,91,166 जणांनी मतदान केले, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय महांतेश यांनी दिली. संडूरमध्ये 76.24 टक्के मतदान झाले. येथे 2023 च्या विधानसभा निवडणुकीत 77.07 टक्के मतदान झाले होते.

उमेदवारांकडून मतदान

शिग्गावमध्ये भाजप उमेदवार भरत बोम्माई यांनी वडील माजी मुख्यमंत्री व खासदार बसवराज बोम्माई यांच्यासमवेत मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. शिग्गावमधील सरकारी मुलांच्या शाळेत त्यांनी रांगेत राहून मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी हुबळीच्या अशोकनगर येथील हनुमान मंदिरात पूजा केली. नंतर गब्बूर क्रॉसजवळील जैन बस्तीला भेट दिली. संडूरमध्ये काँग्रेस उमेदवार अन्नपूर्णा यांनी पती खासदार ई. तुकाराम यांच्यासमवेत येऊन येथील मतदान केंद्र क्र. 67 मध्ये मतदान केले. याच केंद्रावर कामगार मंत्री संतोष लाड यांनी आई शैलजा एस. लाड यांच्यासमवेत येऊन मतदानाचा हक्क बजावला. चन्नपट्टणमध्ये काँग्रेस उमेदवार सी. पी. योगेश्वर यांनी चक्केरे गावातील मतदान केंद्रावर मतदान केले. चन्नपट्टण मतदारसंघातील निजद उमेदवार निखिल कुमारस्वामी हे रामनगर मतदारसंघातील मतदार असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यांनी बुधवारी सकाळी ऐतिहासिक केंगल अंजनेयस्वामी मंदिरात विशेष पूजा केली.

शिग्गावमध्ये भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत वादावादी

शिग्गाव मतदारसंघात अंध मतदाराचे मतदान दुसऱ्याच व्यक्तीने केल्याचा आरोप काँग्रेसने केला. यावरून काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकारही घडला. पोलीस व अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Advertisement
Tags :

.