80 टक्के लोकसंख्या आता शहरांमध्ये
गावं होत आहेत रिकामी : युएनचा अहवाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील एकूण लोकसंख्येच्या 80 टक्के लोक आता शहरांमध्येच वास्तव्यास आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार पूर्ण जगातील 80 टक्के लोकसंख्या आता शहरी क्षेत्रांमध्ये वसलेली आहे. मोठ्या प्रमाणात स्थलांतरामुळे लोक शहरांमध्ये पोहोचत असल्याने हे घडत आहे. अनेक गावे विकासाच्या शर्यतीत सामील होत शहरांमध्ये रुपांतरित झाली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल ‘वर्ल्ड अर्बनायजेशन प्रॉस्पेक्ट्स 2025’नुसार जगातील 81 टक्के लोक शहरांमध्ये आहेत.
2018 हाच आकडा केवळ 55 टक्के होता. अहवालानुसार 45 टक्के लोक शहरांमध्ये वसलेले आहेत. तर 36 टक्के लोक शहरांमधील स्थायी रहिवासी आहेत. हा अहवाल पॅट्रिक गेरलँड यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला आहे. याचबरोबर 2050 पर्यत जगातील 83 टक्के लोक शहरांमध्ये पोहोचतील, असा अनुमान आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी विविध देशांच्या निकषाचाही विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ जपानमध्ये जर 50 हजार लोकांची वस्ती असेल तर त्याला शहराचा दर्जा देण्यात येतो. तर डेन्मार्कमध्ये हा आकडा केवळ 200 लोकांचाच आहे.
या अहवालासाठी 50 हजार लोकसंख्या आणि कमीतकमी 1 चौरस किलोमीटरच्या कक्षेत 1500 लोक स्थायिक असावेत हा निकष लागू करण्यात आला. याचबरोबर नागरी क्षेत्रांसाठी हा आकडा 5000 निश्चित करण्यात आला तर प्रतिचौरस किलोमीटर 300 लोकसंख्येचा निकष हात. अशाप्रकारे जगातील 19 टक्के लोकसंख्याच गावांमध्ये वसलेली आहे. जगातील सर्व हिस्स्यांमध्ये शहरीकरण वाढत आहे. दक्षिण आशियाई देशांमध्येही शिक्षण आणि रोजगारासाठी लोक प्रामुख्याने शहरांच्या दिशेने धाव घेत असल्याचे अहवालात नमूद आहे.
शहरीकरणात नियोजनाशिवाय वाढ झाल्याने काही समस्याही निर्माण होत आहेत. शहराचा विस्तार झाला असला तरीही सार्वजनिक परिवहनाची त्यानुसार व्यवस्था करणे अवघड ठरत आहे. याचबरोबर खासगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचने प्रदूषणाची समस्या तीव्र होतेय. शहरांना योग्य नियोजनाने वसविण्यात आल्यास ती अधिक उपयुक्त ठरतील आणि मानवी जीवनासाठी अधिक सुविधायुक्त देखील ठरतील असे अहवालात म्हटले गेले आहे.