मोबाईल दुकानदारांना 80 लाखांचा चुना
उधारीवर खरेदी करून पोबारा, पाच वर्षांपूर्वी बापट गल्ली परिसरात दुकान थाटणारा व्यापारी मूळचा राजस्थानचा
बेळगाव : बापट गल्ली येथील एका व्यापाऱ्याने मोबाईल दुकानदारांना सुमारे 80 लाख रुपयांना गंडवले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली असून फसवणुकीच्या प्रकारानंतर या दुकानदाराने बेळगाव येथून गाशा गुंडाळला आहे. या व्यापाऱ्याला उधारी मोबाईल पुरविणारे अनेक दुकानदार फशी पडले आहेत. शंकरलाल या नावाने ओळखणाऱ्या या गृहस्थाने बेळगाव येथील वेगवेगळ्या मोबाईल दुकानदारांकडून उधारीवर सुमारे 80 लाख रुपयांचे मोबाईल खरेदी केले होते. त्यांचे पैसे परत न करताच त्याने बेळगाव येथून पळ काढल्याची माहिती मिळाली आहे. पाच वर्षांपूर्वी बापट गल्ली परिसरात दुकान थाटणारा हा व्यापारी मूळचा राजस्थानमधील आहे. सुरुवातीला या व्यापाऱ्याने बेळगाव येथील काही मोबाईल दुकानदारांना आगाऊ रक्कम देऊन त्यांच्याशी व्यवहार केले. आपली प्रतिमा किती स्वच्छ आहे, हे त्यांना दाखवून दिले.
कालांतराने उधारी व्यवहार सुरू झाला. अनेकांकडून खरेदी केलेल्या मोबाईलच्या बदल्यात आठ ते पंधरा दिवसांत तो पैसे देणे करू लागला. त्याच्यावर विश्वास वाढताच त्याने उधारी खरेदी वाढवली. उधारी वाढताच व्यापाऱ्यांना तोंड चुकविण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्यापाऱ्याचे थोडे थोडे पैसे तो परत करत होता. महाद्वार रोड परिसरात कुटुंबासमवेत त्याचे वास्तव्य होते. मोबाईल दुकानदारांची देणी वाढताच त्याने महाद्वार रोड येथील घरही खाली केले असून सध्या हा व्यापारी कोठे आहे, याचा उलगडा झाला नाही. व्यापाऱ्यांमध्ये या फसवणूक प्रकाराची चर्चा सुरू असली तरी कोणीही पोलिसात फिर्याद दाखल केली नाही.
चेन्नई येथील काही व्यापाऱ्यांना 30 लाख रुपयांचा गंडा
उपलब्ध माहितीनुसार शंकरलाल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्यापाऱ्याने चेन्नई येथील काही व्यापाऱ्यांना 30 लाख रुपयांचा चुना लावला आहे. या प्रकरणानंतरच त्याने बेळगावात आपले बस्तान हलवले होते. कर चुकविण्यासाठी हा व्यवसायच बेकायदा असल्यामुळे कोणीही पोलिसात फिर्याद दाखल करण्यासाठी पुढे आले नाहीत. काही व्यापाऱ्यांना त्याने दिलेले धनादेशही वटले नाहीत. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे.