For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुवैतमध्ये आगप्रकरणी 8 जणांना अटक

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुवैतमध्ये आगप्रकरणी 8 जणांना अटक
Advertisement

आरोपींमध्ये 3 भारतीयांचा समावेश : 45 भारतीयांनी गमाविला होता जीव

Advertisement

वृत्तसंस्था /मंगाफ

कुवैतच्या मंगाफ येथे इमारतीला लागलेल्या आगीप्रकरणी अधिकाऱ्यांनी 3 भारतीय, इजिप्तचे 4 नागरिक आणि एका कुवैती नागरिकाला अटक केली आहे. 12 जून रोजी पहाटे 6 मजली इमारतीला लागलेल्या आगीत एकूण 50 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 45 भारतीयांचा समावेश होता. संबंधित इमारतीत 196 कामगार राहत होते, यातील  बहुतांश जण भारतीय होते. तर अटक करण्यात आलेल्या 8 जणांना 2 आठवड्यांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निष्काळजीपणा आणि हत्येच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisement

आगीच्या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 12.5 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा कुवैतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी बुधवारी केली होती. ही रक्कम संबधित देशांच्या दूतावासाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. मृतांमध्ये भारतासोबत फिलिपाईन्सचे नागरिक देखील सामील होते. कुवैतने याप्रकरणाच्या तपासासाठी एक पथक स्थापन केले आहे. या पथकाला आग लागण्यामागील कारण शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कुवैतच्या अग्निशमन दलानुसार ही आग इलेक्ट्रिकल सर्किटमुळे लागली होती. आग लागल्यावर निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांनी घाबरून इमारतीच्या खिडक्यांमधून उडी घेतली होती. अनेक जण इमारतीतच अडकून राहिले आणि श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. संबंधित इमारत बांधकाम कंपनी एनबीटीसीने भाडेतत्वावर घेतली होती.

मल्याळी उद्योजकाची कंपनी

एनबीटीसी कंपनीचे मालक मल्याळी उद्योजक केजी अब्राहम आहेत. केजी अब्राहम हे केरळच्या तिरुवल्ला येथील रहिवासी आहेत. ही कंपनी 1977 पासून कुवैतच्या ऑइल अँड इंडस्ट्रीजचा हिस्सा आहे.  आगीच्या दुर्घटनेतील मृतांचे वय 20 ते 50 वर्षांदरम्यान होते. यातील 23 जण केरळचे, 7 तामिळनाडूचे तर उर्वरित जण वेगवेगळ्या राज्यांमधील होते. हे सर्वजण एनबीटीसी कंपनीत काम करत होते.

Advertisement
Tags :

.