अॅसिड इंजेक्शनद्वारे 8 पॅक एब्स
एका चिनी इसमाने कृत्रिम स्वरुपात 8-पॅक एब्स तयार करण्यासाठी अॅसिड इंजेक्शनवर 4 दशलक्ष युआन म्हणजेच 5 कोटी रुपये खर्च केले आहेत. कृत्रिम स्वरुपात निर्मित पोटाच्या स्नायूंना मनाजोगा आकार देणाऱ्या या इसमाचे नाव एंडी हाओ तिएनन असून तो आता चीनमध्ये चर्चेत आला आहे. पूर्वोत्तर चीनच्या हेइलोंगजियांग प्रांतात राहणारा हाओ सौंदर्य आणि फॅशनशी निगडित कंटेंट शेअर करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या शरीरात 20 टक्के भागात हायलूरोनिक अॅसिड भरलेले असल्याचा दावा करण्यात येतो. हे अॅसिड शरीरात नैसर्गिक स्वरुपात आढळून येणारा पदार्थ आहे.
हाओची योजना अॅसिड शॉट्सचे एकूण 10 हजार डोस टोचून घेण्याची आहे, आणि त्याने स्वत:च्या लक्ष्याचे 40 टक्के पूर्ण केले आहे. काही महिन्यांपूर्वी हाओने स्वत:चे खांदे, कॉलरबोन, छाती आणि पोटात अॅसिडचे 40 टक्के डोस इंजेक्ट करण्यासाठी 4 दशलक्ष युआन खर्च केले होते.
इंजेक्शनमुळे कृत्रिम स्वरुपात पोटावर 8-पॅक एब्सचा आकार तयार करण्यास मदत मिळाली आहे. परंतु त्याने या प्रक्रियेचा तपशील अद्याप सांगितलेला नाही. कॉस्मेटिक संवर्धनाचा मदत घेतली, कारण व्यायामाच्या माध्यमातून मी मनाजोगा शरीराचा आकार तयार करू शकलो नाही, असे हाओने सांगितले आहे.
मेहनत न करणाऱ्या लोकांचे स्नायू बळकट होत नाहीत यावर मी पूर्णपणे सहमत आहे, परंतु मी इतकी इंजेक्शन्स टोचून घेतली आहेत की, आता मी मेहनतीशिवाय पिळदार शरीर प्राप्त केले असल्याचे त्याने म्हटले आहे. जर तीन वर्षांमध्ये माझे एब्स गायब झाले नाहीत तर मी हयालूरोनिक अॅसिडने तयार सर्वाधिक काळ टिकणाऱ्या कृत्रिम एब्सचा विक्रम नोंदविण्यासाठी गिनिज बुकमध्ये अर्ज करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
या प्रोसीजरच्या जवळपास 5 महिन्यांनी ऑक्टोबरच्या अखेरीस पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत त्याने परिणामांबद्दल आनंद व्यक्त केला होता. कुठलीच गडबड झालेली नाही. मला कधीच स्नायूंमध्ये सूज येत नाही. मला तर हेच पसंत आहे. हायलूरोनिक अॅसिड काही महिन्यांमध्ये विरघळून जाईल असे अनेक लोक सांगतात, तर डॉक्टर अॅसिड जागा बदलू शकते, असे सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात वेळेसोबत हे आणखी नैसर्गिक आणि चांगले दिसू लागलंय. पोटाच्या स्नायूंदरम्यानच्या रेखाही स्पष्ट दिसून येतात असे हाओचे सांगणे आहे.
तज्ञांकडून चिंता
ली जियालुन हेबेई प्रांतातील वुहानमध्ये हुआझोंग विज्ञान तसेच तंत्रज्ञान विद्यापीठाच्या टेंगजी मेडिकल कॉलेजमध्ये प्लास्टिक सर्जरी विभागाचे एक चिकित्सक आहेत. हाओची कृती त्याच्या आरोग्यासाठी जोखीमपूर्ण असू शकते. हायलूरोनिक अॅसिडचे 40 डोस इंजेक्ट केल्याने त्वचेची हानी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे नसांमध्ये नेक्रोसिस होऊ शकते. इंजेक्शन घेतल्यावर नैसर्गिक स्नायू प्रत्यक्षात कमी होऊ शकतात, कारण हायलूरोनिक अॅसिड आणि फिलर्स हाडांना नष्ट करू शकतात आणि स्नायूंवर दबाव टाकू शकतात. फिलर विरघळल्यावर मूळ स्नायू आणखी कमकुवत दिसू लागतात असे ली यांनी म्हटले आहे.