कारवारमध्ये चोरी प्रकरणातील 8 लाखांचा ऐवज जप्त
कारवार : बाड-कारवार येथील तेलंगरोड (नंदनगद्दा) घरातील चोरीप्रकरणी कल्याण (महाराष्ट्र) येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 150.4 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह 8 लाख 20 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस खात्याने दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांची नावे रोहीत आनंद हरिजन आणि मोहम्मद सलमान अशी आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्याना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. चोरीची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. चोरीचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. कारवार जिल्हा पोलीसप्रमुख विष्णूवर्धन एस. यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. कारवार शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.