हरियाणात 8 भाजप बंडखोर निलंबित
वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणा राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना मुख्य पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. भारतीय जनता पक्षाने आठ बंडखोर नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्यांमध्ये माजी मंत्री रणजित सिंग चौताला यांचाही समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
रणजित सिंग चौताला यांच्यासह, संदीप गर्ग (लाडवा मतदारसंघातील बंडखोर), झिलेराम शर्मा (आसंद), देवेंदर कादियान (गाणौर), बचन सिंग आर्य (साफीदौन), राधा अहलावत (मेहम), नवीन गोयल (गुरुग्राम) आणि केहार सिंग रावत (हाथीन) या नेत्यांचा निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
काँग्रेसमधून 13 निलंबित
बंडखोरीची लागण काँग्रेसलाही झाली असून या पक्षाने आतापर्यंत 13 बंडखोरांची हकालपट्टी केली आहे. या नेत्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. हे बंडखोर अद्यापही निवडणुकीच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरले आहेत. त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांच्यासंदर्भात हा निर्णय घेतल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
समजूत घालण्यात यश
हरियाणा विधानसभेच्या सर्व 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. प्रारंभी बंडखोरांची संख्या 50 हून अधिक होती. तथापि, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यापैकी बहुतेक बंडखोरांची समजूत घालण्यात यश मिळविले असून त्यांना शांत करण्यात आले आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.