गोकाकमध्ये 68 तोळे सोने; एक किलो चांदीवर डल्ला
विद्यानगरमध्ये दरवाजा फोडून चोरट्यांनी साधला डाव
बेळगाव : बेळगाव शहराप्रमाणे जिल्ह्यातही चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. विद्यानगर, गोकाक येथील एका बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यांनी 68 तोळे सोने व एक किलो चांदीचे दागिने पळविले आहेत. सोमवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली असून गोकाक शहर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
चोरट्यांनी सुमारे 60 लाख रुपयांहून किमतीचे दागिने पळविले आहेत. घटनेची माहिती समजताच गोकाक शहरचे पोलीस निरीक्षक सुरेशबाबू बंडीवड्डर, पोलीस उपनिरीक्षक के. बी. वालीकार आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ज्या घरात चोरीची घटना घडली, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे परिसरातील कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.
सोमवार दि. 17 मार्च रोजी पहाटे 3 ते 4 यावेळेत ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली आहे. यासंबंधी श्रीराम शंकर चौधरी यांनी गोकाक शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. श्रीराम हे गोकाक येथील व्यावसायिक आहेत. कामानिमित्त ते कुटुंबीयांसमवेत परगावी गेले होते. सोमवारी सकाळी घरी परतले. त्यावेळी चोरीची घटना उघडकीस आली.
इंटरलॉक फोडून प्रवेश
विद्यानगर, गोकाक येथील श्रीराम यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाच्या ग्रीलचे कुलूप तोडून दरवाजाचा इंटरलॉक फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. श्रीराम यांच्या आईवडिलांच्या बेडरूममधील तिजोरी फोडून 68 तोळे सोने व एक किलो चांदीचे दागिने पळविले आहेत.
गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आव्हान
गेल्या महिन्याभरापासून गोकाक परिसरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेण्याचे पोलीस दलासमोर आव्हान उभे ठाकले आहे.