785 परीक्षांचा 75 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भार
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठातील परीक्षा विभागांतर्गत दोन सेमिस्टरमध्ये परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा संचालकांसह 75 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर 785 परीक्षा आणि 2 लाख विद्यार्थ्यांचा भार पडत आहे. तोकडे कर्मचारी त्यात वयोमानाने निवृत्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने तांत्रिक कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. परिणामी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करताना मर्यादा येत असून तात्पुरत्या कर्मचाऱ्यावर अवलंबून रहावे लागते. तसेच पेपर तपासणी करणाऱ्या प्राध्यापकांची संख्याही कमी असल्याचा परिणाम परीक्षा कामकाजावर होत असून वेळेत निकाल जाहीर करताना परीक्षा विभागाची दमछाक होत आहे.
राज्य सरकारने नोकर भरतीस खो दिल्याने प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर परीक्षा घेण्यापासून पेपर तपासणीसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. महाविद्यालयीन प्राध्यापकांना परीक्षेचे काम देण्यासाठी मान्यता घेतली नसल्याने, परीक्षेच्या कामासाठी प्राध्यापक उपलब्ध होऊ शकत नाहीत. शिवाजी विद्यापीठातील अभ्यास मंडळांनी मान्यताप्राप्त शिक्षकांची समिती अद्यावत करून पुरेशी संख्या समितीमध्ये घेतलेली नाही. अभ्यास मंडळाच्या समितीमध्ये संख्या कमी असल्याने परीक्षेच्या सर्व कामकाजामध्ये अडचणी येत आहेत.
अगदी प्रश्नपत्रिका काढण्यापासून ते तपासून निकाल जाहीर करण्यापर्यंत परीक्षा विभागाला धावपळ करावी लागते. तरीही उपलब्ध अधिकारी व कर्मचारी परीक्षा घेण्याचे आव्हान पूर्ण करतात. अनेकदा एसआरपीडीच्या माध्यमातून पेपर चुकीचा आला, निकालात त्रुटी राहिल्या अशा अनेक तक्रारी पुढे येतात. या तक्रारींचा सामना विद्यापीठातील परीक्षा विभागाला करावा लागतो. पुन्हा नव्याने त्रुटींची पूर्तता करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो.
परीक्षेसारख्या महत्वाच्या कामासाठी कायमस्वरूपी कर्मचारीच असावेत, असा नियम असला तरी बऱ्याचवेळा तासिका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागते. याकडे सरकार व विद्यापीठ प्रशासनाने लक्ष देऊन परीक्षा विभागाला पुरेसे मनुष्यबळ द्यावे, अशी अपेक्षा विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे विषयांची संख्या वाढत असून, पूर्वीच्या विषयांसह रिपिटर विषयांच्या परीक्षा घ्याव्या लागतात. नवीन विषयांना प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचा भार वाढला आहे. अशातच महाविद्यलय पातळीवर नवीन शैक्षणिक धोरणाबाबत उदासिनता असल्याने, विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती नसते.
विद्यार्थ्यांच्या अज्ञानापोटी परीक्षेतील पेपर कोडवरुनही गोंधळाचे वातावरण निर्माण होते. याला जबाबदार परीक्षा विभाग असला तरी पुरेसे मनुष्यबळ दिल्यास सध्या होणारा गोंधळ होणार नाही. तरीही कमी मनुष्यबळावर रात्रंदिवस काम करून परीक्षेचे कामकाज पूर्ण केले जाते. तसेच निकालही वेळेत लावण्यात शिवाजी विद्यापीठ राज्यात नंबर वन आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
- कर्मचारी व परीक्षांची संख्या
परीक्षा नियमित कर्मचारी तासिका तत्वावरील कर्मचारी विद्यार्थी
785 75 35 2 लाख
- आयसीटी बेसकडे वाटचाल
शिवाजी विद्यापीठात नोकरभरती नसल्याने परीक्षा विभागाला अगदी तोकड्या मनुष्यबळावर काम करावे लागते. त्यामुळे परीक्षा विभागाची आयसीटी बेसकडे वाटचाल सुरू आहे. परीक्षेचा अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंतचे काम ऑनलाईन मोडवर आणले आहे. घरबसल्या विद्यार्थी परीक्षा अर्ज व परीक्षेचे शुल्कही भरू शकतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एसआरपीडीच्या माध्यमातून पाठवल्या जातात. तसेच एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी.च्या अभ्यासक्रमाचे पेपरही ऑनस्क्रिन तपासण्याचे काम सध्या सुरु आहे. विद्यापीठातील परीक्षा विभागाने कमी मनुष्यबळावर तोडगा म्हणून तंत्रज्ञानावर भर दिला आहे.
डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ)