काँगोमध्ये बोट उलटून 78 जणांचा मृत्यू
बचावकार्य सुरू : आफ्रिकन देशातील घटनेने हळहळ
वृत्तसंस्था/किन्शासा
मध्य आफ्रिकन देश काँगोमधील किवू सरोवरात गुऊवारी एक बोट उलटून 78 जणांचा मृत्यू झाल्याचे दक्षिण किवू प्रांताचे गव्हर्नर जीन-जॅक पुरसी यांनी सांगितले. दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये 278 जण असल्याची माहिती उपलब्ध झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला असून बोट पलटी झाल्यानंतर प्रवाशांनी बचावासाठी बरेच प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
देशाच्या पूर्वेकडील कितुकू बंदरापासून काही मीटर अंतरावर ही बोट बुडाली. ही बोट आपल्या बंदरात पोहोचणार होती, परंतु गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी ती काही मीटर अंतरावर बुडाली. ही घटना गुऊवारी घडल्याचे एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले. ही बोट दक्षिण किवू प्रांतातील मिनोवा येथून उत्तर किवू प्रांतातील गोमा येथे जात असताना ही घटना घडली. यापूर्वी जूनमध्ये राजधानी किन्शासाजवळ एक फेरी बुडाल्याने 80 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. तर जानेवारीमध्ये माई-नोम्बे तलावात बोट उलटून 22 जणांचा मृत्यू झाला होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास केल्यामुळे काँगोमध्ये अशाप्रकारे बोटींचे अपघात वारंवार घडत असतात. तसेच, बहुतेक लोक प्रवास करताना लाईफ जॅकेट वापरत नाहीत.