वॉरेन बफेटकडून 7,500 कोटी दान
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
जगातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये स्थान मिळालेले उद्योगपती वॉरेन बफेट यांनी आपल्या अपत्यांकडून चालविण्यात येणाऱ्या समाजसेवी विश्वस्त संस्थांना आपल्या संपत्तीतून साधारणपणे 7 हजार 500 कोटी रुपयांचे (88 कोटी डॉलर्स) दान केले आहे. हे दान त्यांनी समभागांच्या स्वरुपात केल्याची माहिती देण्यात आली. बफेट यांनी बर्कशायर हॅथवेमधील त्यांचे 24 लाख समभागांच्या माध्यमातून दिले आहे. यांपैकी 15 लाख समभाग त्यांनी सुसान थाँपसन बफेट विश्वस्त संस्थेला दिले आहेत. ही संस्था त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावे स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचे व्यवस्थापन त्यांची अपत्ये पाहतात. याशिवाय त्यांनी प्रत्येकी 9 लाख समभाग आपली अपत्ये चालवित असलेल्या शेरवूड संस्था, हॉवर्ड बफेट विश्वस्त संस्था आणि नोव्हो विश्वस्त संस्था यांना दान दिले आहेत.
प्रचंड संपत्तीचे धनी
बफेट यांचा सध्याच्या स्थितीनुसार जगातील श्रीमंतांमध्ये नववा क्रमांक लागतो. त्यांची एकंदर संपत्ती 120.8 अब्ज डॉलर्स (जवळपास 10 लाख कोटी रुपये) असल्याची माहिती ब्लूमबर्ग या सर्वेक्षण संस्थेने दिली आहे. या संपत्तीपैकी 99 टक्के संपत्ती ते समाजाला विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून परत करणार आहेत.