चीनमध्ये कम्युनिस्ट सत्तेची 75 वर्षे पूर्ण
आर्थिक आणि सुरक्षा स्थिती मात्र आव्हानात्मक
वृत्तसंस्था / बीजिंग
कम्युनिस्ट पक्षाला चीनमध्ये सत्तेवर येऊन 75 वर्षांचा कालावधी मंगळवारी पूर्ण झाला आहे. मात्र, चीनी प्रशासनाने हा प्रसंग मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ राजधानी बीजिंगमधील तियानामेन चौकात ध्वजवंदन करण्यात आले आहे. कम्युनिस्ट सत्तेच्या 75 वर्षांच्या अनिर्बंध सत्तेच्या काळाच्या गेल्या काही वर्षात या देशाला आर्थिक आणि सुरक्षा विषयक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे, असे चीनचे म्हणणे आहे. त्यामुळे कम्युनिस्ट सत्तेचा अमृतमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तियानामेन चौक हे चीनी कम्युनिस्ट क्रांतीचे एक महत्वाचे प्रतीक मानले जाते. येथे मंगळवारी ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर चीनच्या ऐतिहासीक राजवाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत चीनच्या लाल सेनेच्या काही तुकड्यांनी संचलन केले. अमृतमहोत्सवी कार्यक्रम एवढ्यावरच उरकण्यात आल्याने जगात अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ही सुद्धा या देशाची एक ‘चाल’ असावी असा काहींना संशय आहे.
एकांगी प्रचार जोरात
चीनमधील कम्युनिस्ट पक्ष सत्तेच्या अमृतमहोत्सवानिमित्त सरकार नियंत्रित चीनी माध्यमांनी एकांगी प्रचार मात्र गेल्या काही महिन्यांपासून जोरात चालविला आहे, असे जागतिक तज्ञांचे मत आहे. गेल्या साडेसात दशकांमध्ये चीनने आर्थिक क्षेत्रात कशी भरारी घेतली, समाजव्यवस्था कशी सुधारली आणि आपल्या लोकसंख्येला कसे समाधानी केले यासंबंधीची माहिती चीनी प्रसारमाध्यमांमधून मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात येत होती आणि अद्यापही येत आहे. तथापि, या देशासमोर गेल्या काही काळात उभी राहिलेली आर्थिक आव्हाने मात्र खुबीने लपविण्यात आली आहेत, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा परिणाम
2020 आणि 2021 या वर्षांमध्ये जगाला ग्रासलेल्या कोरोनाचा प्रारंभ चीनमध्येच झाला होता. या देशाला कोरोनाचा त्रासही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला आहे. कोरोना काळात चीनची अर्थव्यवस्था जगातील इतर अनेक देशांप्रमाणेच घसरणीला लागली होती. मात्र, भारतासह इतर देश आता तो काळ मागे सोडून वेगाने पुढे जात आहेत. पण चीन मात्र कोरोनाच्या दुष्परिणामांमधून अद्याप सावरलेला नाही, असेही काही तज्ञांचे मत आहे.
मालमत्ता व्यवसायाला फटका
गेल्या काही वर्षांमध्ये चीनमध्ये मालमत्ता आणि गृहबांधणी व्यवसायाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. अमेरिकेतील ‘सबप्राईम’ संकटासारखी परिस्थिती चीनमध्ये बांधकाम आणि मालमत्ता विकास या क्षेत्रांमध्ये उद्भवली आहे, असे जाणकारांना वाटते. चीन ते स्पष्टपणे मान्य करत नाही. तथापि, त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन आणि धोरणांवरुन याचे अनुमान मिळते, असे तज्ञांचे मत आहे. बांधकाम आणि मालमत्ता विकास क्षेत्रात चीनला प्रदीर्घ काळ अतिमंदीच्या संकटाला तोंड द्यावे लागत असून त्यामुळे एकंदर आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते, असे विश्लेषण अनेक अभ्यासकांनी केले आहे.
अनेक उपाययोजना
आर्थिक मंदीतून बाहेर येण्यासाठी चीन सरकारने आपली थैली सैल सोडली आहे. मालमत्ता क्षेत्रात अनेक सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. व्याजदर कमी करण्यात आले आहेत. तसेच भाडेपट्टीवर जागा देण्याच्या दरातही कपात करण्यात आली आहे. तरीही हे उपाय प्रभावी ठरताना दिसत नाहीत. या क्षेत्रासह अन्य क्षेत्रांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जात आहेत. हा चीन सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला असून त्याची नोंद सर्वोच्च पातळीवर घेण्यात आली असली तरी संकट अद्यापही आहे तसे आहे.
पुढचा मार्ग खडतर...
गेल्या साडेसात दशकांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात प्रगती आणि उन्नती साध्य केली असली तरी, गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता आगामी भविष्यकाळ खडतर असल्याची जाणीव या देशातील धोरणकर्त्यांना झाली आहे. अतिमहत्वाकांक्षा, विस्तारवाद आणि आक्रमकता यामुळे अन्य देश चीनपासून फटकून वागत आहेत. तसेच चीनच्या आसपासच्या देशांनी त्याच्या विरोधात एकत्र येण्याला प्राधान्य दिल्याने चीनची काही प्रमाणात कोंडी झाली आहे, हे नाकारता येत नाही, असे काही विदेशस्थ चीनी तज्ञही म्हणून लागले आहेत.