For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात 72 टक्के लोक ‘मत्स्याहारी’

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशात 72 टक्के लोक ‘मत्स्याहारी’
Advertisement

त्रिपुरातील लोकांकडून माशांवर मोठा ताव : हरियाणात मासे खाणाऱ्या लोकांचे प्रमाण सर्वात कमी : केरळमध्ये प्रतिदिन मासे खाणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

देशात माशांचा आहारात सर्वाधिक वापर त्रिपुरा या राज्यामध्ये होत असल्याचे एका अध्ययनात दिसून आले आहे. ‘भारतात माशांना मागणी : पॅटर्न आणि कल’ या नावाने हे अध्ययन भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि वर्ल्डफिशकडून अनेक शासकीय संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या अध्ययनानुसार भारतात 96.69 कोटी लोक मासे खातात. देशाच्या लोकसंख्येच्या 72.1 टक्के इतके हे प्रमाण आहे. हरियाणात मासे खाणाऱ्या लोकांची संख्या सर्वात कमी आहे. या राज्यात केवळ 20.55 टक्के लोकच मासे खातात. दररोज मासे खाण्याप्रकरणी केरळ पहिल्या क्रमांकावर आहे.

Advertisement

माशांचा आहारातील समावेश जाणून घेण्यासाठी व्यापक संशोधन आवश्यक आहे. देशातील अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे आणि कुपोषण दूर करण्यात माशांची महत्त्वाची भूमिका असल्याचे आयसीएआरचे उपमहासंचालक (मत्स्य विज्ञान) डॉ. जे.के. जेना यांनी म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य अणि पोषण रणनीतिंमध्ये मासेयुक्त आहाराला सामावून घेण्याचे आवाहन भारतासाठी वर्ल्डफिश कंट्री लीड डॉ. अरुण पडियार यांनी केले आहे. जलीय खाद्यप्रणालींची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी समग्र अणि अनुकूल धोरणांची आवश्यकता आहे. अध्ययनाने माशांना असलेल्या मागणीत अस्थायी कल अणि क्षेत्रीय तसेच लैंगिक फरकांचेही विश्लेषण केले. त्रिपुरामध्ये माशांसाठीच्या ग्राहकांचे प्रमाण गुणोत्तरानुसार सर्वाधिक आहे. राज्यातील 99.35 टक्के लोकसंख्या स्वत:च्या आहारात माशांचा समावेश करते. दुसरीकडे हरियाणात माशांचा आहारातील समावेश गुणोत्तराच्या दृष्टिकोनातून सर्वात कमी आहे. राज्यात केवळ 20.55 लोकसंख्या माशांचे सेवन करते.

सर्वाधिक मागणी

ईशान्य आणि पूर्वेकडील राज्ये, तामिळनाडू, केरळ आणि गोव्यात माशांच्या आहारातील समावेशाचे प्रमाण अधिक आहे. या राज्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या माशांचे सेवन करते. याच्या उलट पंजाब, हरियाणा आणि राजस्थान यासारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये माशांचा आहारातील प्रमाण कमी आहे. यातून आहारसंबंधी प्राथमिकता अणि संभाव्य माशांची उपलब्धता तसेच सांस्कृतिक स्वीकृती दिसून येते. केरळ प्रतिदिन माशांच्या आहारातील वापराप्रकरणी पहिल्या स्थानावर आहे. राज्यात 53.5 टक्के लोक दररोज माशांचे सेवन करतात. यानंतर गोवा (36.2 टक्के), पश्चिम बंगाल (21.9 टक्के), मणिपूर (19.7 टक्के), आसाम (13.1 टक्के) आणि त्रिपुरा (11.5 टक्के) यांचा क्रमांक लागतो. आसाम आणि त्रिपुरा ही राज्ये साप्ताहिक माशांच्या आहारातील वापराप्रकरणी आघाडीवर आहेत. या राज्यांमध्ये 69 टक्के लोकसंख्या साप्ताहिक स्वरुपात माशांवर सर्वाधिक ताव मारतात. अध्ययनानुसार जम्मू-काश्मीरमध्ये माशांच्या आहारातील समावेशाचे प्रमाण वाढत आहे. मागील 15 वर्षांमध्ये तेथे यात 20.9 टक्क्यांची उल्लेखनीय वृद्धी झाली आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये माशांसाठीच्या ग्राहकांमध्ये 3.9 टक्क्यांची घट झाली आहे. अध्ययनात माशांच्या मागणीतील लैंगिक अंतरही नोंदविले गेले आहे. कमी समग्र विक्री दर असलेल्या राज्यांमध्ये पुरुष आणि महिलांमधील माशांच्या वापरात व्यापक अंतर आहे. तेथे पुरुष घराबाहेर माशांचे सेवन करत असावेत असे मानले जात आहे.

मासे खवय्यांची संख्या वाढतेय

भारतात माशांना स्वत:च्या आहारात सामील करणाऱ्या लोकसंख्येत उल्लेखनीय वृद्धी झाली आहे. भारत जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा मत्स्यउत्पादक देश आहे. जागतिक मत्स्यउत्पादनात भारताचे योगदान जवळपास 8 टक्के आहे. परंतु प्रतिव्यक्ती मत्स्यखाद्य पुरवठाप्रकरणी भारत 183 देशांमध्ये 129 व्या स्थानावर आहे. सध्याचा कल कायम राहिल्यास भारतात माशांसाठीची मागणी दुप्पट होण्याचे अनुमान आहे. 2047-48 पर्यंत ही मागणी 26.50 दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत पोहोचू शकते.

Advertisement
Tags :

.