टांझानियातील हिंसाचारात 700 ठार ?
वृत्तसंस्था / दोडोमा
आफ्रिकेतील टांझानिया या देशात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला असून त्यात 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप या देशातील विरोधी पक्ष ‘चाडेमा’ने केला आहे. विरोधी पक्षांनी तेथील विद्यमान सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडले आहे. सरकारने हे आंदोलन दाबून टाकण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग अवलंबिल्याचा आरोप आहे.
या देशाची राजधानी दार एस सलाम येथे सर्वाधिक हिंसाचार झाला आहे. येथे 350 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अन्य एक शहर मवांझा येथे 250 हून अधिक लोक ठार झाले आहेत. सरकारने अत्यंत निर्दयपणे आंदोलकांशी व्यवहार चालविला असून अनेकांना गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. हे आंदोलन आणि हिंसाचार या देशातील सार्वत्रिक निवडणुकीनंतर होत आहे. या निवडणुकीचा निर्णय गेल्या मंगळवारी घोषित करण्यात आला. विद्यमान राष्ट्राध्यक्षा सामिया सुलुहू हसन यांचा या निवडणुकीत विजय झाल्याची माहिती देण्यात आली. तथापि, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यांनी निवडणुकीचा निर्णय अमान्य केला. त्यानतंर बुधवारपासून देशव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
सरकारकडून दमन
आंदोलन चिरडून टाकण्यासाठी या देशातील अनेक शहरांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. सर्व प्रमुख शहरांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात आली असून इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. अनेक शहरांमध्ये आजही आंदोलन होत असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच, सर्व शिक्षणसंस्था आणि औद्योगिक संस्थाही बंद करण्यात आल्या आहेत. सरकारच्या पवित्र्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता तेथील प्रशासनाने व्यक्त केली असून शांततेचे आवाहन केले.