For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 70 मि.मी. पाऊस

11:00 AM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 70 मि मी  पाऊस
Advertisement

सर्वाधिक पावसाची खानापूर तालुक्यात नोंद : पीक कापणीची कामे खोळंबली

Advertisement

बेळगाव : खरिप हंगामातील कापणी अद्याप शिल्लक असून शेतकरी कापणीसाठी लगबग करत होते. मात्र परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातल्याने पुन्हा पिकांची कापणी रखडली आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 70 मि.मी. पावसाची नोंद झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरासरीपेक्षा 30 टक्के कमी पाऊस झाला असला तरी पिकांच्या कापणीला पावसाचा अडथळा येत आहे. यामुळे कापणी लांबणीवर जात आहे. अद्याप भात, भुईमूग, बटाटे व रताळी पीक शेतात पडून आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

जिल्ह्यात 24 तासांत 1 मि.मी पाऊस झाला असून बेळगाव तालुक्यात 1 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर खानापूर तालुक्यात 2 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आठवड्याभरात 20 मि.मी. पाऊस झाला असून खानापूर, बेळगाव व निपाणी तालुक्याला झोडपून काढले आहे. खानापूर 52 मि.मी. तर बेळगाव व निपाणी तालुक्यात 26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून पुन्हा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

यंदा जिल्ह्यात मान्सून पाऊस जोरदार बरसला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. 1 जून ते 31 सप्टेंबरअखेर जिल्ह्यात 746 मि.मी. पाऊस झाला असून सरासरी अंदाजापेक्षा 25 टक्के अधिक पाऊस झाला आहे. याकाळात सर्वाधिक खानापूर तालुक्यात 2081 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यानंतर बेळगाव तालुक्यात 918 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा 12 टक्के पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी रायबाग तालुक्यात 376 मि.मी. पाऊस झाला आहे.

पावसाला कंटाळले नागरिक

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 70 मि.मी. पाऊस बरसला असून सरासरी पावसापेक्षा 30 टक्के कमी पाऊस झाला. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक पाऊस खानापूर तालुक्यात 151 मि.मी. झाला असून सर्वात कमी कागवाड तालुक्यात 23 मि.मी पाऊस झाला आहे. बेळगाव तालुक्यात 96 मि.मी. पाऊस झाला आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरअखेर होत असल्याने नागरिक पावसाला कंटाळले आहेत. पावसामुळे शेतातील कामे तर रखडली आहेतच, शिवाय नागरिकांना बाहेर  पडणेदेखील मुश्कील बनले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यंदा जिल्ह्यात मोठी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत होते. विविध नदीकाठावर अनेकवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे वारंवार शेतीशिवारात पाणी आले होते. परिणामी शेतात बराचकाळ पाणी साचून राहिल्याने पिके वाया गेली. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पण यानंतरही पावसाची रिपरिप कायम राहिल्याने दुबार पेरणीवरही संकट आले. मात्र शेतकऱ्यांनी नियोजनबद्धरित्या शेतीची मशागत केल्याने पीक हाती लागणार आहे.

ऑक्टोबरमध्ये तालुकानिहाय झालेला पाऊस

तालुका         पाऊस मि.मी.मध्ये

  • बेळगाव             96
  • खानापूर           151
  • निपाणी             61
  • चिकोडी           43
  • अथणी             28
  • हुक्केरी            70
  • गोकाक            42
Advertisement
Tags :

.