For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात 70.03 टक्के मतदान

09:50 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात दुसऱ्या टप्प्यात 70 03 टक्के मतदान
Advertisement

227 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद

Advertisement

बेंगळूर : दोन माजी मुख्यमंत्री, एक माजी उपमुख्यमंत्री, सात विद्यमान खासदार, चार मंत्र्यांची मुले यासह एकूण 227 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदानयंत्रात बंद झाले असून 4 जून रोजी मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट होणार आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी उत्तर कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान झाले. मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानात उत्साहाने सहभाग घेतला. एकूण 70.03 टक्के मतदान झाले. राज्यात पहिल्या टप्प्यात दक्षिण कर्नाटकातील 14 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी 69.56 टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात चिकोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, कारवार, दावणगेरे, शिमोगा या मतदारसंघांत मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 66.05 टक्के मतदान झाले. नंतरच्या तासभरात मतदानात जवळपास 3 टक्क्यांनी भर पडली. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड, किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेत आणि सुरळीत मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसून आला. सायंकाळी पाचपर्यंत चिकोडी मतदारसंघात सर्वाधिक 72.75 टक्के तर गुलबर्गा मतदारसंघात सर्वात कमी 57.20 टक्के मतदान झाले. सकाळी 11 पर्यंत मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा दिसून आल्या. उन्हामुळे दुपारनंतर गर्दी कमी झाली. सायंकाळी 4 नंतर पुन्हा चुरशीने मतदान झाल्याचे दिसून आले.

दोन माजी मुख्यमंत्री, एक माजी उपमुख्यमंत्री

Advertisement

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, बसवराज बोम्माई, माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, भगवंत खुबा, विद्यमान खासदार रमेश जिगजिनगी, पी. सी. गद्दीगौडर, अण्णासाहेब जोल्ले, डॉ. उमेश जाधव, बी. वाय. राघवेंद्र, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, मंत्री ईश्वर खंड्रे यांचे पुत्र सागर खंडे, मंत्री शिवानंद पाटील यांची मुलगी संयुक्ता पाटील, मंत्री सतीश जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका जारकीहोळी अशा अनेकांचे राजकीय भवितव्य मतदारांनी ईव्हीएमवरील बटन दाबून निश्चित केले आहे.

काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड

गदग जिल्ह्याच्या लक्ष्मेश्वर तालुक्यातील चार मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदानयंत्रे बदलून मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. शिमोगा लोकसभा मतदारसंघात होसनगर तालुक्यातील सुळूगोडू येथे देखील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते एक तास विलंबाने मतदान सुरू झाले. बिदरच्या नॅशनल कॉलेजमधील मतदान केंद्रातही हीच परिस्थिती उद्भवली. त्यामुळे मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा प्रसंगही घडला. रामचूरच्या सिंधनूर तालुक्यातील कल्मंगी येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने अर्धातास उशिरा मतदान सुरू झाले.

मतदानावर बहिष्कार

कोप्पळ जिल्ह्याच्या कुकनूर येथे वॉर्ड क. 19 मधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. कुकनूर शहरातील गुद्देप्पा मंदिराच्या जागेवर सरकारी इमारत बांधण्यासाठी दिलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी मतदारांनी केली. कोप्पळमधीलच कुष्ठगी तालुक्याच्या तावरगेरे येथे विठलापूर कॉलनीतील मतदारही मतदानापासून दूर राहिले. आठवड्यापूर्वी लक्ष्मी या महिलेचा प्रसूतीवेळी मृत्यू झाला. नाही वेळानंतर नवजात बालकाचाही मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे त्यामुळे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करून नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. दावणगेरेतील लोकिकेरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात यल्लम्मानगर येथे पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी करून येथील ग्रामस्थांनी मतदान करण्यास नकार दिला.

मतदानाचा फोटो : नगरसेवकाविरुद्ध एफआयआर

गुप्त मतदान नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बळ्ळारी महानगरपालिकेचे नगरसेवक कोनंकी तिलक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोनंकी यांनी मतदान करताना भाजप उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबून मत देत असतानाचा फोटो काढून व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला होता. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कौल बाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.

28 हजारहून अधिक केंद्रांत मतदान

उत्तर कर्नाटकातील 14 मतदारसंघांमध्ये एकूण 2,59,52,958 मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र होते. त्यात 1,29,48,978 पुरुष, 1,29,66,570 महिला आणि 1945 तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. मतदानासाठी एकूण 28,269 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. 1.45 लाख मतदान केंद्र अधिकारी, 35 हजार पोलीस, निमलष्करी दलाच्या 65 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

सुरपूरमध्ये भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी

यादगिरी जिल्ह्यात मंगळवारी सुरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसह लोकसभेसाठी मतदान झाले. सुरपूर तालुक्यातील बादापूर येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्राजवळ भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, यावेळी दगडफेकीचा प्रकारही घडला. दगडफेकीत भीमण्णा ब्याळी (वय 50) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्याला यादगिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंक्षणात आणली. गावात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.

कर्नाटकात काँग्रेसला अधिक जागा : खर्गे

लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला अधिक जागा मिळण्यात कोणतीही शंका नाही, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला. मंगळवारी त्यांनी कलबुर्गी येथील ब्रह्मपूर कॉलनीतील मतदान केंद्रात पत्नी राधाबाई खर्गे यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानात इंडिया आघाडीला जनतेकडून चांगला पाठिंबा मिळाला आहे. यामुळे इंडिया आघाडी आणखी मजबूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया खर्गे यांनी दिली.

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (सायं. 5 पर्यंत)

मतदारसंघ वर्ष 2024

 • चिकोडी     72.75%
 • बेळगाव     65.67%
 • बागलकोट 65.55%
 • विजापूर     60.95%
 • गुलबर्गा     57.20%
 • रायचूर       59.48%
 • बिदर         60.17%
 • कोप्पळ     66.05%
 • बळ्ळारी    68.94%
 • हावेरी        71.90%
 • धारवाड     67.17%
 • कारवार     69.57%
 • दावणगेरे    70.90%
 • शिमोगा     72.07%
Advertisement
Tags :

.