डीएलएफच्या खात्यात 6 महिन्यात 7 हजार कोटी रुपये जमा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील कंपनी डीएलएफने आर्थिक वर्षात पहिल्या 6 महिन्यात 7 हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम फ्लॅट बुकिंगच्या माध्यमातून मिळवली आहे. घरांच्या मागणीत राहिलेल्या वाढीमुळे कंपनीला वरील रक्कम मिळवणे शक्य झाले आहे.
आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात कंपनीने 66 टक्के वाढीसह फ्लॅट बुकिंगच्या माध्यमातून 7094 कोटी रुपये मिळवले आहेत. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीला बुकिंगच्या माध्यमातून 4268 कोटी रुपये प्राप्त झाले होते. पहिल्या तिमाहीतील उत्तम कामगिरीचा फायदा कंपनीला एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत उठवता आला. पहिल्या तिमाहीत फ्लॅट बुकिंगमधून 6400 कोटी रुपये कंपनीच्या खात्यात जमा झाले होते. संपूर्ण आर्थिक वर्षात फ्लॅट बुकिंगच्या माध्यमातून 17 हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज कंपनीने वर्तवला होता.
नफा, उत्पन्नात कामगिरी सरस
बाजार भांडवल मूल्याच्या तुलनेत पाहता डीएलएफ ही सर्वात मोठी बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 1381 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीचा नफा 622 कोटी रुपयांचा होता. एकूण उत्पन्नात 48 टक्क्यांची वाढ झाली असून ते 2180 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या वर्षी जुलै-सप्टेंबरमध्ये 1476 कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने मिळवले होते.